(नवी दिल्ली)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेने हा कठोर निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे भारताच्या 86 अब्ज डॉलर्स (सुमारे 7.59 लाख कोटी रुपये) किमतीच्या निर्यातीपैकी तब्बल 60 अब्ज डॉलर्सची निर्यात थेट प्रभावित होणार आहे. यात सर्वाधिक फटका कामगारकेंद्री क्षेत्रांना, मासे व सागरी उत्पादनं, कापड, चामडे, रत्न-दागिने यांना प्रामुख्याने बसणार आहे.
कोणत्या क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम?
- कापड उद्योग : अमेरिकेला 10.3 अब्ज डॉलर्सची निर्यात; सर्वाधिक फटका.
- रत्न व दागिने : अमेरिका ही मोठी बाजारपेठ, निर्यात घटणार.
- झींगा व सागरी खाद्यपदार्थ : निर्यात घटल्याने शेकडो कारखाने बंद होण्याची शक्यता.
- चामडे व शूज उद्योग : उत्पादन घट, रोजगारात कपात होऊ शकते.
- फर्निचर व इतर उद्योग : मागणी कमी होण्याची भीती.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालानुसार, या 50% टॅरिफमुळे भारताच्या 66% निर्यातीवर परिणाम होणार आहे.
भारताला सर्वात मोठा व्यापारी धक्का
GTRI चे सहसंस्थापक अजय श्रीवास्तव यांच्या मते, हे भारताला गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठे व्यापारी नुकसान आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 49.6 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली येऊ शकते. या टॅरिफमुळे चीन, व्हिएतनाम, मेक्सिको, तुर्की, पाकिस्तान, नेपाळ आणि केनिया या देशांना फायदा होईल, कारण ते अमेरिकेला पर्यायी पुरवठा करू शकतात.
2024 मध्ये भारताची अमेरिकेला निर्यात (7.59 लाख कोटी रुपये)
- यंत्रसामग्री : 1.68 लाख कोटी
- इलेक्ट्रॉनिक्स व आयफोन : 1.28 लाख कोटी
- औषधे व फार्मा : 0.92 लाख कोटी
- हिरे व दागिने : 0.87 लाख कोटी
- कापड : 0.82 लाख कोटी
- रसायने : 0.37 लाख कोटी
- पेट्रोलियम उत्पादने : 0.36 लाख कोटी
- इतर (ऑटो पार्ट्स, मसाले, मातीची भांडी, प्लास्टिक, चामडे, तांदूळ, तंबाखू) : 1.29 लाख कोटी

