( नवी दिल्ली )
संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) ‘बराकाह’ अणुऊर्जा प्रकल्पाजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेला “धोकादायक वाढ” असे संबोधत सर्व संबंधित पक्षांनी तात्काळ संयम बाळगावा आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतावे, असे आवाहन केले आहे.
UAEच्या अल धफ्रा परिसरातील Barakah Nuclear Power Plant येथे झालेल्या या ड्रोन हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या बाहेरील भागात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. UAE प्रशासनाच्या माहितीनुसार, अणुप्रकल्पाच्या अंतर्गत सुरक्षा परिघाबाहेर असलेल्या एका विद्युत जनित्राला ड्रोनची धडक बसली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच किरणोत्सर्गाची गळतीही झालेली नाही. प्रकल्पातील सर्व सुरक्षा यंत्रणा सुरक्षित असून अणुभट्ट्या सुरळीत कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “UAEमधील अणुसुविधेला लक्ष्य करून करण्यात आलेला हल्ला पूर्णपणे अस्वीकार्य आहे. अशा कृतींमुळे प्रादेशिक तणाव अधिक धोकादायक स्वरूप धारण करू शकतो.” भारताने सर्व पक्षांनी संवाद आणि राजनैतिक मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, UAEने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत त्याला “चिथावणीशिवाय केलेला दहशतवादी हल्ला” असे संबोधले आहे. UAEच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीचा कठोरपणे सामना केला जाईल, असा इशाराही दिला आहे.
या घटनेनंतर International Atomic Energy Agency अर्थात IAEAनेही चिंता व्यक्त केली आहे. संस्थेच्या माहितीनुसार, आगीमुळे प्रकल्पातील एका अणुभट्टीला सध्या आपत्कालीन डिझेल जनित्रांद्वारे वीजपुरवठा केला जात आहे. तसेच अणुसुविधांच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या लष्करी हालचाली टाळण्याचे आवाहन IAEAने केले आहे.
UAE संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, पश्चिम सीमेकडून तीन ड्रोन देशाच्या हवाई हद्दीत घुसले होते. त्यापैकी दोन ड्रोन हवेतच पाडण्यात आले, तर तिसरा ड्रोन विद्युत जनित्रावर आदळल्याचे सांगण्यात आले. UAEने अधिकृतपणे कोणत्याही देशाचे नाव घेतले नसले, तरी प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर संशयाची सुई इराणकडे वळत असल्याची चर्चा आहे.
दक्षिण कोरियाच्या मदतीने सुमारे २० अब्ज डॉलर्स खर्चून उभारण्यात आलेले ‘बराकाह’ अणुऊर्जा केंद्र २०२०पासून कार्यरत आहे. संपूर्ण अरब जगतातील हे एकमेव कार्यरत अणुऊर्जा केंद्र असून UAEच्या एकूण वीज गरजेपैकी जवळपास २५ टक्के वीज या प्रकल्पातून निर्मिती होते.

