(संगमेश्वर / एजाज पटेल)
निसर्गाच्या अद्भुत किमया अनेकदा माणसाला आश्चर्यचकित करून सोडतात. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे गावात अशीच एक विलक्षण घटना समोर आली असून, एका नारळाच्या झाडामध्ये चक्क विघ्नहर्ता गणपती बाप्पाची हुबेहूब आकृती साकारल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. या अनोख्या दृश्यामुळे परिसरात आश्चर्य आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नारडुवे येथील मधलीवाडी परिसरात राहणारे दीपक बाबाजी जोगळे यांच्या घरामागील नारळाच्या बागेत हा प्रकार आढळून आला. संध्याकाळच्या सुमारास बागेतील झाडांची साफसफाई आणि झावळ्या काढण्याचे काम सुरू असताना विजय शिगवण यांचे लक्ष एका नारळाच्या झाडाच्या वरच्या भागाकडे गेले. झाडाचा काही भाग सुकलेला असताना त्यातून फुटलेल्या नव्या अंकुरांनी आणि सालीच्या विशिष्ट आकाराने एक वेगळीच प्रतिमा तयार झाली होती.
जवळून निरीक्षण केल्यानंतर त्या आकारात साक्षात गणरायाचे रूप दिसत असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी तत्काळ ही बाब दीपक जोगळे आणि परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेत या निसर्गनिर्मित आकृतीचे दर्शन घेतले.
या आकाराकडे बारकाईने पाहिल्यास बाप्पाची डावीकडे वळलेली सोंड स्पष्टपणे जाणवते. तसेच मस्तक, गोलाकार पोट आणि एका बाजूला झुकून बसल्यासारखी मुद्रा देखील दिसून येते. झाडाच्या तपकिरी सुकलेल्या सालीमुळे जणू गणरायाने पितांबर धारण केल्याचा भास होत असून हिरव्या आणि तपकिरी रंगांच्या संगमामुळे ही आकृती अधिक उठून दिसत आहे.
वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने पाहता, झाडांची वाढ, हवामानातील बदल, छाटणी किंवा पेशींच्या नैसर्गिक रचनेमुळे अशा प्रकारचे आकार निर्माण होऊ शकतात. मात्र कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय इतकी स्पष्ट आणि आकर्षक आकृती निर्माण होणे ही दुर्मिळ बाब मानली जात आहे.
दरम्यान, या अनोख्या घटनेची चर्चा आता सोशल मीडियावरही रंगू लागली आहे. नारळाच्या झाडातील गणरायाची ही प्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक उत्सुकता व्यक्त करत असून, नारडुवे गाव सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

