(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर परिसरात गेल्या दोन–तीन दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला असून पहाटेपासूनच गारठ्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. सकाळी धुक्याची चादर पसरल्याने वातावरणात हाडं गोठवणारी थंड लहर जाणवत आहे. तापमानात मोठी घसरण झाल्याने बाजारपेठ, चौक-चौपाट्यांमध्ये शेकोट्या धगधगू लागल्या आहेत.
लहान मुले, वृद्ध आणि कामगार वर्ग सर्वाधिक त्रस्त झाला असून पहाटे कामावर जाणाऱ्यांना गार वाऱ्यामुळे चांगलाच त्रास होत आहे. हॉटेल, चहा स्टॉल आदी ठिकाणी गर्दी वाढली असून गरम पेयांना मोठी मागणी दिसून येत आहे. शेतकऱ्यांचेही कामकाज प्रभावित झाले असून सकाळच्या थंडीत शेतामध्ये काम सुरू करणे कठीण बनले आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना उबदार कपडे वापरणे, लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घेणे आणि थंड वाऱ्यापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे. अचानक वाढलेल्या या थंडीमुळे संगमेश्वरकरांनी शेकोट्यांचा आधार घेत हिवाळ्याचा तडाका कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. थंडीचा हा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

