(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
संगमेश्वर तालुक्यातील धामणी यादववाडी येथील श्री गजानन महाराज (शेगाव) मंदिरात श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचे भक्त गोपीनाथ मधुकर यादव तसेच समस्त भक्त मंडळाच्या वतीने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मंदिर परिसरात सकाळी भावपूर्ण काकड आरतीने कार्यक्रमांची सुरुवात होणार असून, दिवसभर नामस्मरण, भजन, कीर्तन तसेच विशेष पूजा-अर्चा आयोजित करण्यात येणार आहे.
या मंगल सोहळ्याच्या निमित्ताने दुपारच्या सत्रात भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींचे दर्शन घ्यावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भक्त गोपीनाथ यादव आणि धामणी भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन शेगावचे संत श्री गजानन महाराज भक्त मंडळाकडून करण्यात येत आहे.

