(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये गावचा सुपुत्र आणि समाजकार्याची विश्वासार्ह ओळख ठरलेले सुनील गेल्ये यांना विश्व समता कलामंच या सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘विश्व समता राज्यस्तरीय समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोवले (ता. संगमेश्वर) येथील मयूरबाग परिसरातील शुभगंधा हॉलमध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला तालुक्यासह जिल्हा आणि परजिल्ह्यातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या समता, मानवता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर आधारित कार्य करणाऱ्या या संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. गेली दोन दशके कोणतीही अपेक्षा न ठेवता, प्रसिद्धीपासून दूर राहून समाजातील तळागाळातील, वंचित व दुर्लक्षित घटकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या सुनील गेल्ये यांच्या कार्याची दखल घेत यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता. प्रत्यक्ष सोहळ्यात त्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि मानाचा पट्टा देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमास संगमेश्वर तालुक्याचे माजी सभापती दिलीप पेंढारी, अनंत मांडवकर, संजय गेल्ये, जनार्दन शिरगावकर, अजित मोहिते, प्रचित मोहिते, सतीश पवार, उमेश बाईत यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुनील गेल्ये यांच्या सौभाग्यवती सुप्रिया सुनील गेल्ये आणि चिरंजीव ओंकार गेल्ये यांनीही या सन्मानाचा क्षण जवळून अनुभवला. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. उपस्थितांनी उभे राहून केलेले अभिनंदन हे त्यांच्या कार्याची पोचपावती ठरले.
तळागाळातील सेवेला प्राधान्य
सुनील गेल्ये यांचे समाजकार्य हे केवळ औपचारिक उपक्रमांपुरते मर्यादित नाही. गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, गंभीर आजारग्रस्त रुग्णांसाठी तातडीने आर्थिक मदत उभी करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वह्या-पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य पुरवणे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तसेच पूर, अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्यक्ष मदतकार्य अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
कोणाचीही हाक आली की वेळ, दिवस किंवा रात्र न पाहता धावून जाणे हीच त्यांची ओळख बनली आहे. त्यामुळेच तेर्ये गावापुरते नव्हे, तर संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात ते “आपला माणूस” म्हणून ओळखले जातात.
कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील गेल्ये यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेताना सांगितले की, समाजकार्य म्हणजे केवळ एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम नसून तो जीवन जगण्याचा दृष्टिकोन आहे. गेल्ये यांनी हा दृष्टिकोन कृतीतून दाखवून दिला आहे. त्यांच्या कार्यात प्रसिद्धीपेक्षा परिणामकारकतेला महत्त्व असून सातत्य, पारदर्शकता आणि निःस्वार्थ सेवाभाव हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
“हा सन्मान माझ्या समाजाचा”
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सुनील गेल्ये भावूक झाले. ते म्हणाले, “आज मिळालेला हा सन्मान माझा वैयक्तिक नसून माझ्या कुटुंबाचा, सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या समाजबांधवांचा आहे. समाजाने दिलेल्या प्रेमाचे हे फळ आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून पुढेही वंचित, गरजू आणि दुर्लक्षित घटकांसाठी अधिक जोमाने काम करत राहीन.” त्यांच्या या शब्दांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
पुरस्कार जाहीर झाल्यापासूनच तेर्ये गावात आणि संगमेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण होते. प्रत्यक्ष सन्मानानंतर ग्रामस्थ, युवक, विविध सामाजिक संस्था आणि मित्रपरिवाराकडून सुनील गेल्ये यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“सुनील गेल्ये हे केवळ कार्यकर्ते नाहीत, तर संकटसमयी धावून येणारे आधारवड आहेत,” अशी भावना माजी सभापती दिलीप पेंढारी यांनी व्यक्त केली. समाजासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या व्यक्तीचा राज्यस्तरावर सन्मान झाल्याने तेर्ये गावाची मान उंचावली असून, या पुरस्कारामुळे समाजातील माणुसकी, समता आणि सेवाभाव अधिक बळकट होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

