(दापोली)
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी आता थेट इस्रोपर्यंत झेप घेतली आहे. दापोली तालुक्यातील पाच विद्यार्थिनी १९ ते २३ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या इस्रो अभ्यास दौर्यासाठी रवाना झाल्या असून, त्यांना दापोली पंचायत समितीतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
चाळणी परीक्षेत यश मिळवत निवड झालेल्या या विद्यार्थिनींना पंचायत समिती सभापती उन्मेषराजे, गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, माजी सभापती शांताराम पवार, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, शिक्षण विस्तार अधिकारी वलेले तसेच पोषण आहार अधीक्षक सचीन रेमजे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छा देऊन रवाना करण्यात आले.
यावेळी बोलताना सभापती उन्मेषराजे यांनी सांगितले की, “गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना इस्रो-नासा अभ्यास दौर्यासाठी विमानप्रवासाची संधी उपलब्ध करून देणारी रत्नागिरी जिल्हा परिषद ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद असावी. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समिती दापोली कायम कटिबद्ध राहील.”
गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी ‘व्हिजन दापोली’ या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. “विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांना यशाच्या दिशेने नेण्याचा ‘व्हिजन दापोली’चा प्रयत्न आहे. या यशामध्ये शिक्षक आणि पालकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
१९ ते २३ मेदरम्यान विमानप्रवास करत भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या अभ्यास दौर्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये निरजा वेदक, दिक्षा येसावरे, अक्षरा पाटील, प्रांजल खळे आणि सृष्टी कोठावळे यांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मिळालेल्या या संधीमुळे दापोली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

