(दापोली)
तालुक्यातील आर.जी.पवार माध्यमिक शाळा – टांगर शाळेच्या सन २००० -२००१ च्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २५ वर्षानी रविवार दि.२२ डिसे. रोजी पुन्हा एकदा वर्ग भरला. तीच इमारत, तोच वर्ग आणि शिक्षकही तेच. बालपणातील सर्व सवंगडी एकत्र यावेत या उद्देशाने तत्कालीन टांगर, आवाशी, शिरसोली, हातीप, ओळवण पंचक्रोशीतील माजी विद्यार्थ्यांनी शाळेत रविवारी स्नेहमेळावा उत्साहात साजरा केला.
स्नेहमेळाव्यात संस्थेचे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक, आजी-माजी शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे गेटवर उभे राहून पुष्वृष्टी करत स्वागत केले. सर्व आजी माजी विद्यार्थी, आजी माजी शिक्षकांनी शाळेच्या बाकावर बसून आपल्या शाळेच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या.
मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आले. शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तु देऊन सन्मानीत केले. सर्व माजी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. शाळेला तिन वॉटर प्युरिफायर, बैठका, भिंतीवरील घड्याळ, टेबल मॅट, फुलस्केप सेट, फ्रेम इत्यादी भेटवस्तू या विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या.
सेच याच शाळेतील याच बॅचच्या विद्यार्थांनी खो-खो खेळामध्ये मिळवलेले राज्यस्तरीय यशाचे स्मरण करीत आज पुन्हा मैदानात तोच खेळ अनुभवला आणि सर्वांसोबत स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता केली.