(राजापूर / तुषार पाचलकर)
द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि प्रकाश आंबेडकर यांचे बंधू डॉ. भिमराव आंबेडकर यांनी रविवार, १७ मे २०२६ रोजी पाचल येथे सदिच्छा भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कुडाळ येथे आयोजित धम्मपरिषदेला जात असताना त्यांनी पाचल येथे थांबून विविध सामाजिक आणि बौद्ध संस्थांना भेट दिली.
पाचल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पाचल येथील दीक्षाभूमीला भेट देत परिसराची पाहणी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी पतसंस्था यांच्या कार्यालयालाही त्यांनी सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी पतसंस्थेच्या वतीने, पाचल बौद्ध विकास मंडळ मुंबई, वंचित बहुजन आघाडी पाचल विभाग तसेच भारतीय बौद्ध महासभा पाचल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. भिमराव आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पतसंस्थेचे संचालक आणि बौद्धाचार्य प्रमोद जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या मनोगतात त्यांनी पाचल परिसरातील धम्मचळवळीचा इतिहास उलगडून सांगितला. विशेषतः मे १९५८ मध्ये या परिसरात झालेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षा कार्यक्रमाची आठवण करून देत त्यांनी त्या काळातील सामाजिक परिवर्तनाचा आढावा घेतला. तसेच पतसंस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा सविस्तर परिचय उपस्थितांना करून दिला.
पतसंस्थेची वाटचाल, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्य पाहून डॉ. भिमराव आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी उपस्थित धम्मबंधूंना मार्गदर्शन करताना बौद्ध समाजाने शिक्षण, संघटन आणि सामाजिक ऐक्य यांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. तसेच आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर समाजाने जागरूक राहून आपली अचूक नोंद करणे किती महत्त्वाचे आहे, याबाबतही त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पाचल बौद्ध विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष अशोक तांबे, भारतीय बौद्ध महासभेचे सुधाकर जाधव, शरद जाधव, संदेश जाधव, वंचित बहुजन आघाडीचे रमेश पाजवे, नरेश कांबळे, सिताराम जाधव, विनय जाधव, मुंबई येथील बोराडे गुरुजी, विनय कुंभवडेकर, राजेश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि धम्मबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

