(दापोली)
दापोली–खेड महामार्गावरील नवानगर परिसरात आज बुधवार, दि. ५ मार्च रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने चालक थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी स्विफ्ट कार (क्रमांक MH 08 AX 0525) दापोलीहून खेडच्या दिशेने जात होती. नवानगर परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यालगत मोरीसाठी ठेवलेले तीन सिमेंट पाईप होते. याच ठिकाणी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सिमेंट पाईपवर जाऊन धडकली.
या जोरदार धडकेत कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विशेषतः पुढील डावा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रस्त्यालगत निष्काळजीपणे ठेवलेल्या बांधकाम साहित्यामुळेच हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र नंतर परिस्थिती सुरळीत करण्यात आली.

