(संगमेश्वर /प्रतिनिधी)
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कसबा गावातील भिंती आता कोकण आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची जिवंत साक्ष देऊ लागल्या आहेत. स्वराज्य महोत्सवानिमित्त आयोजित भित्तीचित्र स्पर्धेत राज्यभरातील कलाकारांनी साकारलेल्या आकर्षक चित्रकृतींमुळे संपूर्ण कसबा नगरीला सांस्कृतिक रंग लाभला असून पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कसबा गावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लाभले आहे. या ऐतिहासिक नगरीत छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र आणि कोकण संस्कृतीवर आधारित भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांच्या पुढाकारातून तसेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने हा स्वराज्य महोत्सव उत्साहात पार पडला. सलग तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कोकणातील लोकजीवन, पारंपरिक संस्कृती, ग्रामीण जीवनशैली, सण-उत्सव तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडवणारी भित्तीचित्रे कसबा गावातील विविध भिंतींवर साकारण्यात आली. रंग, रेषा आणि कल्पकतेच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या कलाकृतींमुळे गावाला नवे सौंदर्य प्राप्त झाले आहे.
विशेष म्हणजे या भित्तीचित्रांमुळे कसबा गाव पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू लागले असून गावातील सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे समोर येत आहे. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृती साकारणाऱ्या विजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वराज्य महोत्सवाच्या माध्यमातून इतिहास, कला आणि संस्कृती यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळत असल्याची भावना उपस्थितांकडून आता व्यक्त केली जात आहे.

