(चिपळूण/ रत्नागिरी)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाने हालचाली गतिमान केल्या आहेत. याच अनुषंगाने उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीची मासिक संघटनात्मक बैठक धवल प्लाझा येथे उत्साहात पार पडली. संघटनात्मक कामकाजाचा आढावा, मतदार याद्यांचे नियोजन, बूथस्तरावरील बांधणी आणि आगामी निवडणुकांची तयारी या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत नवनियुक्त रत्नागिरी उत्तर व दक्षिण जिल्हा प्रभारी आकाश छाजेड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी शशांक बावचकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कोकण विभाग काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष यासीन बुबेरा यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयूआय तसेच पक्षाच्या विविध विभागांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेत आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. निवडणुकीच्या दृष्टीने बूथ लेव्हल एजंट (बीएलए-२) यांच्या नियुक्त्या, मतदार याद्यांची पडताळणी आणि बूथनिहाय संघटनात्मक बांधणी यांना प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता पक्षाचे कार्यकर्ते तळागाळात सक्रिय राहावेत, यावरही भर देण्यात आला.
काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, विविध सामाजिक घटकांशी संवाद वाढविणे आणि पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय अधिक दृढ करणे, या बाबींवरही बैठकीत चर्चा झाली. आगामी निवडणुकांना सामोरे जाताना संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची एकजूट आणि बूथस्तरावरील सक्रियता या बाबी निर्णायक ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसला नव्याने संघटनात्मक बळ देत पक्षाचे काम अधिक गतिमान करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.


