(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर एसटी स्थानक ते शास्त्री पूल या मार्गावर दगड-माती भरून ने-आण करणारे डंपर अतिवेगात वावरत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आधीच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असून, वाहतुकीची स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.
या मार्गावरून जाणारे डंपर वेळोवेळी रस्त्यावर माती-दगड टाकून जातात, त्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय बनतो. इतर वाहनचालक अत्यंत सावधपणे वाहने चालवत असताना, ठेकेदारांचे हे अवजड वाहनचालक कोणतीही काळजी घेत नाहीत.
एप्रिल महिन्यात कुरधुंडा येथे अशाच प्रकारात मोठ्या मशिनच्या साहाय्याने काळा दगड फोडण्याचे काम सुरू होते. रस्ता वाहतुकीसाठी खुला असताना, यंत्राच्या जोरकस धक्क्याने उडालेला दगड सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांच्या पायाला लागला होता. त्यांनी यासंदर्भात संगमेश्वर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलीस प्रशासनाने ठेकेदारांना पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला ठेकेदारांनी केराची टोपली दाखवली असून, मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे.
महामार्गावर माती-दगड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आच्छादन (कव्हर) असणे आवश्यक आहे. यामुळे रस्त्यावर माती-दगड पडणार नाहीत आणि इतर वाहनचालकांना त्रास होणार नाही. पण ठेकेदारांनी या सुरक्षिततेच्या उपायांकडे पाठ फिरवली असून पोलीस आदेशांचीही उघडपणे पायमल्ली केली आहे.
शनिवारी सकाळी पत्रकार एजाज पटेल दुचाकीने जात असताना डंपरमधून उडालेला दगड त्यांच्या पायावर आपटल्याने त्यांना दुखापत झाली. जर हाच दगड डोळा वा डोक्याला लागला असता, तर गंभीर परिणाम झाला असता! हे प्रकार केवळ निष्काळजीपणातून नव्हे, तर उद्दाम मनोवृत्तीमधून घडत आहेत.
या महामार्गावरील अर्धवट, ढिसाळ कामांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. याबाबत अनेकदा प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार निकम यांनीही या कामांवर कडक शब्दांत टीका केली होती.
प्रशासनाने सर्व बाबींचा विचार करून, सुरक्षित आणि पर्यायी उपाययोजना राबवून कामे सुरू ठेवली तर अशा प्रकारांना आळा बसेल. मात्र ठेकेदारांचा बेजबाबदारपणा आणि उद्दामपणा थांबला नाही, तर हा खेळ नागरिकांच्या जीवाशी खेळण्याइतकाच गंभीर ठरू शकतो.