(नवी दिल्ली)
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET (नीट) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी मोठी कारवाई करत प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमधील एका सदस्य महिलेला अटक केली आहे. दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने आरोपी मनीषा मांढरे हिला 14 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे NEET परीक्षेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विशेष न्यायाधीश कोलेट रश्मी कुजूर यांनी हा आदेश दिला. मनीषा मांढरे ही या प्रकरणातील नववी आरोपी असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची ती सदस्य होती. सीबीआयच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे हिने रसायनशास्त्राचे शिक्षक पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांच्या संगनमताने प्रश्नपत्रिका फुटीचा कट रचल्याचा आरोप आहे. तिला मथुरा येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली.
यापूर्वी 16 मे रोजी न्यायालयाने पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांना 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले होते. तर 15 मे रोजी धनंजय लोखंडे याला सहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, मनीषा वाघमारे हिने NEET ची प्रश्नपत्रिका धनंजय लोखंडे याच्याकडे सुपूर्द केली होती. त्यानंतर धनंजयनं ती प्रश्नपत्रिका शुभम खैरनारपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे.
सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3 मे रोजी परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात WhatsApp आणि Telegram च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी NTA च्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक वरुण भारद्वाज यांनी दिलेल्या तक्रारीनंतर 12 मे रोजी सीबीआयनं FIR दाखल केली होती.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात नाशिकमधील शुभम खैरनार याने यश यादव याच्याशी संपर्क साधला होता. NEET प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी 10 ते 12 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. त्यानंतर 29 एप्रिल रोजी यश यादव याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिका Telegram द्वारे PDF स्वरूपात पाठवल्याचा आरोप आहे.
या प्रश्नपत्रिकांच्या प्रती काढून त्या विद्यार्थ्यांमध्ये वितरित करण्यात आल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. जयपूरमधील मंगिलाल बिवाल याने प्रश्नपत्रिकांचे प्रिंटआउट काढून मुलगा अमन बिवाल तसेच नातेवाईक आणि इतर परिचितांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात 14 मे रोजी न्यायालयाने पाच आरोपींना सीबीआय कोठडीत पाठवले होते. त्यामध्ये नाशिकचा शुभम खैरनार, जयपूरचे मंगिलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल आणि गुरुग्रामचा यश यादव यांचा समावेश आहे. शुभम खैरनारला 13 मे रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला आणण्यात आले.
दरम्यान, 3 मे रोजी झालेल्या NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप समोर आल्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी जाहीर केली होती. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणामुळे देशभर संताप व्यक्त केला जात आहे. आता ही परीक्षा पुन्हा 21 जून रोजी घेण्यात येणार आहे.

