(नाशिक)
भोंदूबाबा प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या शहरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रवींद्र एरंडे (वय ६३) याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे गुप्त व्हिडिओ तयार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी अशोक नगर परिसरातील आरोपीच्या कार्यालयावर छापा टाकून महत्त्वाचे तांत्रिक पुरावे जप्त केले. यात 4 मोबाईल, 2 पेनड्राइव्ह, 1 मेमरी कार्ड आणि इतर डिजिटल उपकरणांचा समावेश आहे. या उपकरणांमधील डेटाची तपासणी सुरू असून, त्यातून अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान, आरोपीच्या पेनड्राइव्हमध्ये 7 महिलांचे तब्बल 120 व्हिडिओ आढळून आल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. यासह हस्तरेषा तज्ञ असल्याचा दावा करुन एरंडे यानेही कथित ‘भविष्यवाणी’ केल्याचा संशय आहे.
ब्लॅकमेलिंगचा संशय; महिलांना पुढे येण्याचे आवाहन
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिलांना नोकरी किंवा इतर आमिष दाखवून फसवत होता. त्यानंतर गुप्तपणे व्हिडिओ चित्रित करून त्यांचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केल्याचा संशय आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी संबंधित महिलांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीच्या घर आणि कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे आणि नोंदी मिळाल्या आहेत. याशिवाय, काही प्राण्यांचे अवयवही आढळून आले असून त्यांचा नेमका वापर काय होता, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांच्या मते, आरोपी तपासात पूर्ण सहकार्य करत नाही. व्हिडिओ शूट करण्यासाठी वापरलेल्या कॅमेराबाबत माहिती देण्यास तो टाळाटाळ करत आहे. या पार्श्वभूमीवर अधिक तपासासाठी पोलिसांनी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत रवींद्र एरंडे याला 10 एप्रिलपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, बचाव पक्षाचे वकील अरुण दोंदे यांनी आरोपीविरोधातील आरोप अतिशयोक्त असल्याचा दावा केला. “आरोपी आधीच काही दिवसांपासून ताब्यात आहे. पोलिसांकडून त्याच कारणांसाठी पुन्हा कोठडी मागितली जात आहे,” असा युक्तिवाद त्यांनी केला.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील चौकशीत आणखी पीडित महिला आणि संबंधित तपशील समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

