( मुंबई )
लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबईतील दादर येथील शिवतीर्थावर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सोनम वांगचुक आणि नीट (NEET) पेपरफुटीविरोधात आंदोलन करणारे अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.
सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही आता क्षुल्लक गोष्ट आहे. केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाहीत. देशात रोजगार, शिक्षण आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर उत्तर देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे.”
‘सरकार बदलेपर्यंत संघर्ष सुरूच राहिला पाहिजे’
उद्धव ठाकरे यांनी तरुणांना आंदोलनात पुढाकार घेण्याचे आवाहन करत म्हटले, “हा लढा केवळ सोनम वांगचुक यांचा नाही. देशातील प्रत्येक तरुण, विद्यार्थी आणि नागरिकाचा हा लढा आहे. मी नेतृत्व करण्यासाठी आलो नाही, तर तुम्हीच नेतृत्व करा, असे सांगण्यासाठी आलो आहे. सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगत राहिली पाहिजे.” ते पुढे म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नको, तर सरकारच बदलले पाहिजे. जनतेला रोजगार, शिक्षण आणि न्याय देण्यात अपयशी ठरलेल्या सत्तेला जनतेने उत्तर द्यावे.”
पंतप्रधान मोदी आणि RSS वर निशाणा
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. “काही जण म्हणतात ‘मेलोडी खाओ, खुद जान जाओ’. तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या मिळत आहेत. आम्ही हिंदू आहोत आणि देशभक्तही आहोत. मात्र, आमचे हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचे नाही,” असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
‘पाकिस्तानशी चर्चा, पण वांगचुकांशी नाही?’
नागपूर दौऱ्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानसोबत चर्चा व्हायला हवी, असे मत व्यक्त केले होते. जो देश आपल्या सैनिकांवर हल्ले करतो, दहशतवादी घुसखोरी करतो, त्याच्याशी चर्चा करण्याची तयारी दाखवली जाते. मग देशासाठी काम करणारे आणि सैनिकांसाठी सोलार टेंट तयार करणारे सोनम वांगचुक यांच्याशी संवाद का साधला जात नाही?” त्यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांच्या विधानाचाही उल्लेख करत, “भागवत म्हणतात आम्ही हिटलरसारखे नाही. मग हेच मोदींनाही सांगायला हवे,” अशी टीकाही केली.
‘भ्रष्ट सत्तेला हटवण्याची शपथ घ्या’
सभेच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचे आवाहन केले. “भ्रष्टांना सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय देशाला पर्याय नाही. सरकार बदलण्याच्या निर्धाराने आपण आंदोलनाची सुरुवात करूया. ही लढाई केवळ एका व्यक्तीची नसून लोकशाही, रोजगार, शिक्षण आणि संविधान वाचवण्याची आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, शिवतीर्थावरील या सभेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, आगामी काळात विरोधक आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

