(सोलापूर)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ची आणखी एक यशस्वी चाल खेळत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि माढ्याचे माजी आमदार यशवंत माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, या घडामोडींनी सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी राजन पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद (राज्यमंत्री दर्जा) सोडल्याची घोषणा केली. “राष्ट्रवादीकडून मला हे पद मिळाले होते. आता मी पक्ष बदलत असल्याने राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा,”
अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
अजित पवार गटाला दुहेरी धक्का
राज्यमंत्री दर्जाचे पद गमावल्याने अजित पवार गटाला राजकीय आणि प्रतिष्ठेचा दुहेरी फटका बसला आहे. या नियुक्तीवरून पूर्वीच सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी टीका केली होती. “निष्ठेला महत्त्व नाही म्हणता, मग सहकार परिषदेचे अध्यक्ष कसे झालात?” असा सवाल त्यांनी उपस्थित करून राजीनाम्याची मागणी केली होती.
मोहोळ तालुक्यातील हे नेते भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये मोठी बळकटी देऊ शकतात. या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील सत्ता समीकरणात बदल होण्याची चिन्हे आहेत, तर अजित पवार गटात अस्थिरतेची लाट निर्माण झाली आहे.
राज्यात सध्या महायुतीचे सरकार सत्तेवर आहे, आपण “एकमेकांच्या पक्षांत फोडाफोडी नको” असे सूत्र ठरलेले असताना मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी फोडाफोडीच्या राजकारणाला उत आला आहे. भाजपला राज्यातील अधिकाधिक स्थानिक संस्था आपल्या ताब्यात घ्यायच्या असल्याने, आता विरोधी पक्षांप्रमाणेच महायुतीतील सहयोगी पक्षांमध्येही प्रवेश मोहिमेला गती देण्यात आली आहे. तर अजून काही प्रवेश बाकी आहेत, असे भाजपा नेते खाजगीत सांगत आहेत. आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपने “सत्ताकेंद्रे वाढवण्यासाठी सर्वच पर्याय खुले ठेवले आहेत” असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

