(मुंबई)
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रभर अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि धार्मिक आडून होणाऱ्या फसवणुकीविरोधात मोठी कारवाई सुरू झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत राज्यातील तब्बल 35 भोंदूबाबांविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले असून, अनेक ठिकाणी त्यांच्या तथाकथित दरबारांवर पोलिसांनी धाडी टाकून कारवाई केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या सर्व आरोपींची यादी जाहीर केली असून, या घटनांमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.
अंनिसच्या माहितीनुसार, नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर अनेक पीडित महिलांना पुढे येऊन तक्रार करण्याचे धैर्य मिळाले. ग्रामीण भागासह शहरांमध्येही भोंदूगिरीचे जाळे पसरल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळ झाल्याचे गंभीर आरोप आहेत. सामाजिक बदनामी आणि भीतीमुळे अनेक पीडित अद्यापही पुढे येण्यास घाबरत असल्याचे अंनिसने स्पष्ट केले आहे.
अंनिसच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून तक्रारी दिल्या, तर अनेक प्रकरणांमध्ये संघटनेच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या सर्व प्रकरणांमध्ये जादूटोणा विरोधी कायदा तसेच फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि महिलांच्या शोषणाशी संबंधित विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरोधात दीर्घकाळ लढा उभारण्यात आला होता. त्यानंतर 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा, जादूटोणा आणि त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम’ लागू झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. मात्र, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात शासन अपयशी ठरत असल्याची टीका अंनिसकडून करण्यात आली आहे.
राज्यात ज्या बाबांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये नाशिकचे अशोक कुमार खरात, संगमनेरचे गडगेबाबा राजेंद्र गडगे, पुण्यातील पंकज घोलप, सोलापूरचे मोहन मामा भोसले, नवी मुंबईतील अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा, ठाण्यातील मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित, धुळ्यातील कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते यांच्यासह मुंबई, पुणे, नाशिक, नांदेड, रायगड, पालघर, भंडारा, अकोला आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक बाबांचा समावेश आहे.
अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात सुरू झालेल्या या कारवाईमुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचे मोठे जाळे उघड होत असून, आगामी काळात आणखी अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

