( रत्नागिरी )
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील सामाजिक कार्यकर्ते आशिष मोरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
मागील दौऱ्यात आमदार प्रमोद जठार यांनी “शतप्रतिशत भाजपा”चा निर्धार व्यक्त करत कार्यकर्त्यांना संघटन वाढीसाठी कामाला लागण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शहरातील विविध भागांतून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या प्रयत्नातून आशिष मोरे यांनी भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, आमदार प्रमोद जठार यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात युवक आणि सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये सक्रिय होण्यास इच्छुक असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला ओंकार फडके, संदीप सुर्वे यांच्यासह भाजपचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

