(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील करंजारी गावचे प्रगतीशील आंबा उत्पादक राजेश रवींद्र हेगिष्टे आणि सागर रवींद्र हेगिष्टे या बंधूंनी देशस्तरीय ‘मिलांज आंबा महाराजा’ आंबा प्रदर्शन आणि स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सर्वोत्कृष्ट हापूस आंबा फळ विभागात प्रथम क्रमांकाचे मानाचे पारितोषिक पटकावत त्यांनी करंजारी गावासह संगमेश्वर तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे.
हेगिष्टे बंधूंनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ रवींद्र एकनाथ हेगिष्टे यांच्या नावाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. दि. १५ ते ३१ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या आंबा प्रदर्शनात देशभरातील नामांकित आंबा उत्पादकांनी सहभाग घेतला.
उत्कृष्ट दर्जा, आकर्षक रंग, नैसर्गिक सुगंध आणि अप्रतिम चव या गुणांमुळे रत्नागिरी हापूसच्या फळांना परीक्षकांकडून विशेष पसंती मिळाली. याच गुणवत्तेच्या जोरावर हेगिष्टे बंधूंनी प्रथम क्रमांक पटकावत आपली वेगळी छाप पाडली. या यशाबद्दल क्रांती व्यापारी संघटना, देवरुख तर्फे हेगिष्टे बंधूंचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी हापूसच्या गुणवत्तेला राष्ट्रीय स्तरावर दाद
या यशामुळे संगमेश्वर तालुक्यातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. उत्कृष्ट प्रतीचा रत्नागिरी हापूस उत्पादनासाठी अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा शेतकऱ्यांना मिळत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
रत्नागिरी हापूस हा केवळ एक फळ नसून कोकणातील शेतकऱ्यांच्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या परंपरेचे प्रतीक मानला जातो. जगभरातील ग्राहकांना आपल्या खास चव आणि सुगंधाने भुरळ घालणाऱ्या हापूस आंब्याला मिळालेली ही राष्ट्रीय स्तरावरील मान्यता कोकणासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
हेगिष्टे बंधूंच्या या यशामुळे करंजारी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातील युवा आंबा उत्पादकांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

