(रत्नागिरी / वार्ताहर)
कोकणात उद्योग येत नाहीत हा जुना ठपका पुसून काढत रत्नागिरीतील स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे. ‘जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६२ उद्योग घटकांशी तब्बल २ हजार १५९.३७ कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) करण्यात आले असून, या गुंतवणुकीतून एकूण २ हजार ४२६ रोजगारनिर्मिती होणार आहे. यामध्ये रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या १०० कोटी रुपयांच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला बळ देण्यासाठी परिषदेत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. एक्सप्रेस ग्रुपकडून १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येणार आहे. विमानतळापासून २ किलोमीटर, शहरापासून ३ किलोमीटर आणि समुद्रापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर एमआयडीसीच्या जागेत हे हॉटेल उभारले जाणार आहे. तसेच जयगड येथे आनंद महिंद्रा यांच्या पंचतारांकित हॉटेलचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, हे हॉटेल लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होत आहे.
रत्नागिरी विमानतळाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘एटीआर’ (ATR) प्रवासी विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, “रत्नागिरीचा जीडीपी गेल्या २० वर्षांच्या तुलनेत कित्येक पटीने वाढला असून, यात स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा आहे. स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेत २,१५९ कोटींची गुंतवणूक केली आहे. हे सर्व प्रकल्प १०० टक्के पूर्ण करून पुढील वर्षी ५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प आपण पूर्ण करू.”
जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी स्टील उद्योग, सेमीकंडक्टर प्रकल्प आणि नव्या एमआयडीसीबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. येत्या ७, ८ आणि ९ तारखेला जिल्ह्यात स्टील उद्योगाचा मार्ग मोकळा होत असून, यामुळे किमान १० ते १२ हजार स्थानिकांना रोजगार मिळेल. ‘व्हीआयटी’कडून जमीन काढून ती ‘आर आर पी’ (RRP) या सेमीकंडक्टर कंपनीला दिली जात आहे. तसेच निवेंडी, वाटद आणि मेर्वी येथे नव्या प्रदूषणविरहित एमआयडीसी उभारल्या जात आहेत.
उद्योगांसाठी एमआयडीसीची जागा मिळवण्यासाठी ‘मिलाप’ (Milap) ॲप सुरू करण्यात आले आहे. सोमवारी वैध अर्ज केल्यास पुढच्या सोमवारी घरबसल्या थेट ऑफर लेटर मिळेल, अशी माहिती देण्यात आली. तसेच ‘मैत्री’ (Maitri) पोर्टलवर अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत दाखला मिळणे बंधनकारक असून, उशीर झाल्यास अधिकार आयुक्तांकडे जाऊन पुढील ८ दिवसांत मंजुरी दिली जाते.
तरुणांनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना’ आणि केंद्राच्या ‘विश्वकर्मा योजने’चा लाभ घेऊन स्टार्टअप्स उभारावेत आणि नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे बनावे, असे आवाहन उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेत हॉटेल एक्सप्रेस इनकडून १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून फाईव्ह स्टार हॉटेल, SQUARE पोर्ट शिपायार्ड प्रायव्हेट लिमिटेडकडून १ हजार ४१३ कोटी रुपयांची गुंतवणूक करून जहाजबांधणी उद्योग, सोलर scape LLPकडून ३५ कोटी, DELUXE फिशरिजकडून १० कोटी आणि RA स्पेशियालिटी केमिकलकडून १५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
राज्यस्तरावर ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांत १ हजार ८३७ गुंतवणूक करारांद्वारे ८२ हजार ६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, याद्वारे १ लाख ५५ हजार ३८९ जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आगामी कालावधीत उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिल्हा गुंतवणूक करार परिषदांचे आयोजन प्रस्तावित असून, त्याद्वारेही राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन युवक व युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. परिषदेला उद्योग विभागाचे सहआयुक्त संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी मिनाक्षी कुंभार, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, सहायक आयुक्त अजिंक्य अजगेकर, एमआयडीसी फेडरेशनचे प्रशांत पटवर्धन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, उद्योजक राजेश सावंत, राज आंब्रे यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक आयुक्त अजिंक्य अजगेकर यांनी आभार मानले.

