( विल्ये / अमित कांबळे )
कोळीसरे बौद्धजन कमिटी ग्रामीण, मुंबई तसेच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १५ आणि आदर्श महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नूतन बुद्ध विहाराचे उद्घाटन, बुद्धरूप अनावरण तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध गीतकार, संगीतकार आणि गायक संतोष सावंत ‘पावा’ यांचा विशेष संगीत कार्यक्रम होय. रविवार, दि. १७ मे रोजी रात्री ९ वाजता ‘जागतिक शांतीची स्वरयात्रा’ या संगीतमय कार्यक्रमातून ‘पावा’ उपस्थितांना धम्म प्रबोधनासह सुरेल गीतांचा आनंद देणार आहेत.
या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, समाजकल्याण सभापती अॅड. सुयोग नंदकुमार कांबळे तसेच भंते करुणानंद महाथेरो आणि भिक्खू संघही उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे गावचे सुपुत्र असलेले संतोष सावंत ‘पावा’ यांनी आपल्या धम्म गीतांद्वारे देश-विदेशात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विविध देशांमध्ये आपल्या कलेच्या माध्यमातून धम्म, मानवता आणि शांततेचा संदेश पोहोचवत त्यांनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
स्वतःच्या मातीत, आपल्या गावात आणि आपल्या लोकांसमोर हा विशेष कार्यक्रम सादर करताना आनंद होत असल्याची भावना ‘पावा’ यांनी व्यक्त केली आहे. निवळी, जाकादेवी, खंडाळा परिसरासह विविध गावांतील रसिक या कार्यक्रमासाठी उत्सुक असून ‘पावा’ यांच्या जागतिक प्रवासाचे अनुभव आणि धम्म संगीताचा अनोखा संगम अनुभवण्यास नागरिकही आतुर आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन कोळीसरे बौद्धजन कमिटी तसेच संतोष सावंत ‘पावा’ यांनी केले आहे.

