(रत्नागिरी)
धनज्योती महिला प्रभागसंघ, नाचणे यांच्या वतीने PRI–CBO उपक्रमांतर्गत एकदिवसीय मूल्यमापन व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन कुवारबाव ग्रामपंचायत येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला ग्रामसंघ पदाधिकारी, समुदाय संसाधन व्यक्ती, प्रभागसंघ पदाधिकारी, LRP कॅडर, आशा व अंगणवाडी सेविका, प्रभागस्तरीय कॅडर तसेच बालसभा प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक (रत्नागिरी), प्रभाग समन्वयक (नाचणे) आणि PRI–CBO प्रकल्पाचे तालुकास्तरीय संसाधन व्यक्ती यांचीही विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. विधी बारगोडे यांनी केले.
उपस्थित मान्यवरांनी नाचणे प्रभागातील ग्रामपंचायतींमध्ये महिलांचा पंचायत राज उपक्रमांमधील वाढता सहभाग हा अत्यंत सकारात्मक बदल असल्याचे सांगितले. “कुटुंब श्री संस्थेसोबतचा पहिला टप्पा यशस्वी दिसत असून, पुढील टप्प्यात अधिक सक्रिय सहभागासह प्रकल्पाची अंमलबजावणी मजबूत केली जाणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमाच्या अंगाने ग्रामपंचायत स्तरावरील विविध योजनांचे रांगोळी रूपातील सादरीकरण करण्यात आले. तसेच गेल्या काही महिन्यांत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे छायाचित्र व माहितीचे भित्ती प्रदर्शनही उपस्थितांच्या विशेष प्रशंसेस पात्र ठरले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती नाचणे प्रभागातील कॅडरांनी सादर केलेली “गाव बदलतंय” ही नाटिका. या नाटिकेत ग्रामीण विकास, महिलांची भूमिका व PRI–CBO उपक्रमाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले असून, पुढील टप्प्यात गावोगाव महिलांचा सहभाग अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.

