(रत्नागिरी /प्रतिनिधी)
एसटी बस आणि स्थानकांच्या स्वच्छतेच्या नावाखाली प्रत्येक प्रवाशाकडून अतिरिक्त दोन रुपये आकारण्याचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वादग्रस्त निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. प्रवासी संघटना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उभारलेल्या आक्रमक आंदोलनानंतर परिवहन मंत्र्यांनी हा ‘स्वच्छता अधिभार’ येत्या १ जून २०२६ पासून अधिकृतपणे रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे रत्नागिरीसह राज्यभरातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एसटी महामंडळाने काही दिवसांपूर्वी प्रवाशांच्या तिकिटावर अतिरिक्त दोन रुपयांचा ‘स्वच्छता कर’ लागू केला होता. मात्र, या निर्णयाविरोधात सर्वसामान्य प्रवासी, विविध प्रवासी संघटना आणि सामाजिक स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. रखडलेले रस्ते, अपुरी बससेवा, वारंवार होणारे विलंब आणि ग्रामीण भागातील वाहतूक समस्यांनी आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांवर हा अतिरिक्त आर्थिक बोजा अन्यायकारक असल्याची भूमिका पुढे येत होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. “स्वच्छता राखणे ही महामंडळाची मूलभूत आणि नैतिक जबाबदारी असताना त्यासाठी प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे आकारणे अयोग्य आणि अन्यायकारक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले होते.
दत्ता कदम यांच्या नेतृत्वाखाली युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, विविध प्रवासी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी विभाग नियंत्रक तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाला कडक शब्दांत निवेदन सादर केले होते. हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास जिल्हाभर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता. प्रवासी संघटनांचा वाढता दबाव, सर्वसामान्य प्रवाशांमधील असंतोष आणि राज्यभर उमटलेल्या जनक्षोभाची दखल घेत परिवहन मंत्र्यांनी अखेर माघार घेत स्वच्छता अधिभार रद्द करण्याची घोषणा केली. येत्या १ जूनपासून हा अतिरिक्त शुल्क पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, हा निर्णय जाहीर होताच रत्नागिरीतील एसटी प्रवासी, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवून महामंडळाला निर्णय बदलण्यास भाग पाडल्याबद्दल जिल्हाप्रमुख दत्ता कदम आणि विविध प्रवासी संघटनांचे प्रवाशांकडून आभार मानण्यात आले.

