(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळ संचलित देव घैसास कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील द्वितीय व तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ यांच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर येथे आयोजित “Environmental Vision: Integrative Academia-Industry Dialogue” या एकदिवसीय कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दि. 17 मार्च 2026 रोजी पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या विनामूल्य कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरणीय दृष्टिकोन आणि औद्योगिक क्षेत्र यांची सांगड कशी घालावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यावरणशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक ऋजुदा जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सकाळच्या सत्रासाठी आसमंत फाउंडेशनचे संस्थापक-संचालक नंदकुमार पटवर्धन, औद्योगिक तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल सावंत, आबासाहेब गरवारे कॉलेज येथील जैवविविधता व पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सोनाली शिंदे, तसेच उपपरिसर संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी आणि सहा. कुलसचिव अभिनंदन बोरगावे उपस्थित होते.
यानंतर पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संचालक डॉ. कुलकर्णी तसेच नंदकुमार पटवर्धन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे डॉ. सोनाली शिंदे आणि डॉ. प्रफुल्ल सावंत यांनी आपल्या तज्ज्ञ विषयांवर मार्गदर्शन केले आणि सकाळच्या सत्राची सांगता झाली.
दुपारच्या सत्रात गद्रे मरीन प्रा. लि. चे चेअरमन दीपक गद्रे, भारतीय अणुऊर्जा महामंडळ चे अतिरिक्त मुख्य अभियंता आशुतोष शेवपुरे, सडेकर एन्विरोटेक प्रा. लि. चे संचालक प्रभाकर सडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दीपक गद्रे यांनी मार्गदर्शन करत कार्यशाळेच्या विषयावर चर्चा केली.
यानंतर मान्यवरांनी विद्यार्थी व शिक्षकांसोबत पर्यावरणीय दृष्टीकोनातून उद्योजकतेवर संवाद साधला. पुढे विद्यार्थ्यांसाठी “Climate Skills Activity” चे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेस महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग प्रमुख सहा. प्रा. सानिका कीर आणि रसायनशास्त्र विभाग प्रमुख सहा. प्रा. आसावरी मयेकर उपस्थित होत्या. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

