( राजापूर / वार्ताहर )
व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाचा बेजबाबदार वापर वैयक्तिक बदनामीसह सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी कसा धोकादायक ठरू शकतो, याचा प्रत्यय राजापूर आणि रत्नागिरी येथे घडलेल्या घटनेतून आला आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर महिलेच्या चारित्र्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बदनामी केल्याच्या रागातून संबंधित व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी दुसऱ्या बाजूच्या लोकांविरुद्धही पोलिसांत प्रतिगुन्हा दाखल झाला आहे.
सुमारे ४२७ सदस्य असलेल्या ‘पंचक्रोशी समाचार’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर श्रीकृष्ण देविदास शिर्सेकर (वय ४५, सध्या रा. नाचणे, रत्नागिरी) याने आपल्या भावजयीच्या चारित्र्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि अश्लील व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सौ. शिरसेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाटे सागरी पोलीस ठाण्यात श्रीकृष्ण शिर्सेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७९ आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पोस्टमुळे आपली जाणीवपूर्वक बदनामी झाल्याचा आरोप करत सौ. शिरसेकर आणि त्यांच्यासोबत आलेल्या काही व्यक्तींनी रत्नागिरी येथे जाऊन संशयिताला मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कायदा हातात घेतल्याच्या आरोपावरून सौ. शिरसेकर यांच्यासह इतरांविरुद्ध रत्नागिरी पोलीस ठाण्यात प्रतिगुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आक्षेपार्ह पोस्ट आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या व्यक्ती पोलिसांच्या कारवाईच्या कक्षेत आल्या आहेत.
एका आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन कुटुंबांमधील तसेच गावांमधील वाद वाढून सामाजिक शांततेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता या घटनेतून अधोरेखित झाली आहे. सोशल मीडियावर महिलांचा अपमान करणारा, चारित्र्यहनन करणारा किंवा सामाजिक सलोखा बिघडवणारा मजकूर प्रसारित करणे गंभीर ठरू शकते. त्यामुळे व्हॉट्सॲप ग्रुपवर अशा प्रकारची पोस्ट आढळल्यास तिचे समर्थन करण्याऐवजी त्याला स्पष्टपणे विरोध करणे, संबंधित ॲडमिनला पोस्ट हटवण्याची विनंती करणे आणि आवश्यक असल्यास पोलिसांकडे तक्रार करणे महत्त्वाचे आहे.
त्याचप्रमाणे, एखाद्याने बदनामी केल्याचा आरोप असला तरी रागाच्या भरात संबंधित व्यक्तीला मारहाण करणे हा योग्य मार्ग नाही. अशा वेळी कायदा हातात घेण्याऐवजी पोलिसांत तक्रार दाखल करून कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा, अन्यायाविरोधात दाद मागणाऱ्यांनाही स्वतःच्या कृतीमुळे कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
सोशल मीडियाचा वापर व्यक्तीची बदनामी करण्यासाठी किंवा समाजात तेढ निर्माण करण्यासाठी न करता सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी व्हायला हवा. डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर, कायद्याबाबत जागरूकता आणि समाजप्रबोधन यांची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


