( रत्नागिरी /प्रतिनिधी )
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांसह मारुती मंदिर परिसरातील सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याचा मुद्दा वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी तालुका शाखेने उपस्थित केला आहे. हे कॅमेरे तातडीने दुरुस्त करून सुरू करावेत, तसेच स्मारक परिसरात चोवीस तास प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहरातील महत्त्वाच्या पुतळा परिसरांचे सुशोभीकरण आणि सुधारणा केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानतानाच, सुरक्षिततेसाठी उभारलेल्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत आघाडीने चिंता व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर वाढण्याची किंवा मद्यपान करून पुतळ्यांची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्यास अनुचित घटनेची नोंद आणि संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्यात अडचणी येऊ शकतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा: वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल; डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरातील तुटलेला कठडा पूर्ववत
या विषयावर चर्चा करताना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बागाटे यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सीसीटीव्ही सुरू करण्याबाबत सूचना दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या या तत्परतेबद्दल पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बंद असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दुरुस्त करावेत, स्मारक परिसरात चोवीस तास पुरेशी प्रकाशव्यवस्था ठेवावी आणि सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, अशा मागण्या वंचित बहुजन आघाडीने केल्या आहेत. तसेच, सीसीटीव्हीचे नियंत्रण स्थानिक पोलीस ठाण्याशी जोडल्यास संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि अनुचित घटना घडल्यास तपासाला मदत होणे शक्य होईल, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
आठ दिवसांची मुदत
या मागण्यांवर आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी तालुका शाखेतर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, महासचिव बिपिन आयरे, जिल्हा सहसचिव राकेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र जाधव आणि सल्लागार अजित जाधव उपस्थित होते.


