(चिपळूण / रत्नागिरी)
घराशेजारी उभारण्यात आलेल्या पोल्ट्री व्यवसायाबाबत तक्रार केल्याच्या रागातून एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कापसाळ-मधलीवाडी येथे घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
१४ मे रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात पूजा राजेंद्र कडवईकर या जखमी झाल्या असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदेश हरिश्चंद्र साळवी, साधना बळीराम साळवी, दीपाली बळीराम साळवी आणि मधुकर सदाशिव साळवी (सर्व रा. कापसाळ-मधलीवाडी) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पोल्ट्रीसंदर्भात तक्रार केल्याचा राग मनात धरून आरोपींनी वृद्ध महिलेशी वाद घालत मारहाण केली. संदेश साळवी यांनी कौलाने मारहाण केल्याचा आरोप असून, साधना साळवी आणि दीपाली साळवी यांनी फिर्यादीच्या मुलाचा मोबाईल हिसकावून फेकून दिल्याचे म्हटले आहे. तर मधुकर साळवी यांनी शिवीगाळ करून दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाचा अधिक तपास सावर्डे पोलीस ठाणे करत आहे.

