(मुंबई / रत्नागिरी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचा सल्ला दिल्यानंतर देशभरात इंधन दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर ती भीती खरी ठरली असून देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. एप्रिल २०२२ नंतर प्रथमच इंधनाच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा मोठी झळ बसली आहे.
नव्या दरानुसार पेट्रोल प्रतिलीटर ३ रुपयांनी तर डिझेल ३.११ रुपयांनी महागले आहे. या वाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ होणार असून त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी महागाईचा भडका उडण्याची भीती अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचा दर आता १०६.५८ रुपयांवर पोहोचला असून डिझेल ९३.०८ रुपये प्रतिलीटर झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने १०८ रुपयांचा टप्पा ओलांडला असून डिझेलचे दरही ९५ रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोलचा दर १०८.३५ रुपये तर डिझेल ९४.९२ रुपये इतका झाला आहे. रायगडमध्ये पेट्रोल १०८.२३ रुपये आणि डिझेल ९४.६७ रुपये दराने विकले जात आहे. तर पालघरमध्ये पेट्रोल १०७.२१ रुपये आणि डिझेल ९३.६८ रुपये झाले आहे. मराठवाड्यातील परभणी येथे पेट्रोलचा दर १०८.६३ रुपये तर डिझेल ९५.१३ रुपयांवर पोहोचला आहे. जालन्यात पेट्रोल १०८.५० रुपये आणि डिझेल ९५.१७ रुपये झाले असून धुळे जिल्ह्यात डिझेलचा दर ९५.२० रुपयांपर्यंत गेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात पेट्रोल १०६.८२ रुपये आणि डिझेल ९३.४६ रुपये दराने उपलब्ध आहे. कोल्हापुरात पेट्रोल १०७.४९ रुपये तर डिझेल ९४.१५ रुपये झाले आहे. सांगलीमध्ये पेट्रोल १०७.१६ रुपये आणि डिझेल ९३.७१ रुपये दराने विकले जात आहे.
विदर्भात अमरावतीमध्ये पेट्रोल १०८.१४ रुपये आणि डिझेल ९४.७८ रुपये इतके झाले आहे. नागपुरात पेट्रोल १०७.१३ रुपये आणि डिझेल ९३.६७ रुपये दराने मिळत आहे. भंडाऱ्यात पेट्रोल १०७.७९ रुपये आणि डिझेल ९४.३० रुपये इतके नवे दर लागू झाले आहेत. दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक, कृषी, बांधकाम तसेच उद्योग क्षेत्रावर अतिरिक्त आर्थिक ताण पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात याचा थेट परिणाम बाजारातील महागाईवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

