(मुंबई)
अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. हा प्रकार अनैतिकच नाही, तर घटनाबाह्य असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले की, अंबरनाथमधील 12 नगरसेवकांनी आधी स्वतंत्र गट स्थापन करणे आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणे हे कायद्याच्या विरोधात आहे. या सर्व नगरसेवकांना लवकरच कायदेशीर नोटिसा बजावण्यात येणार असून, त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी न्यायालयात लढा दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. कोणतीही चर्चा न करता घेतलेला हा निर्णय चुकीचा असून, काँग्रेसने तत्काळ संबंधित नगरसेवकांवर कारवाई करत त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. मात्र भाजपने त्यांना थेट पक्षात सामावून घेतल्याने भाजपाचा दुटप्पीपणा समोर आला आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.
सत्तेसाठी भाजप कोणाशीही हातमिळवणी करत असल्याचा आरोप करत सपकाळ म्हणाले की, अकोटमध्ये एमआयएमसोबत युती करणाऱ्या भाजपाची हीच मानसिकता आहे. भाजपाच्या कथनी आणि करणीत मोठा फरक असून, हा नैतिक अधःपतनाचा कळस आहे, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बिनविरोध निवडणुकांवर भाष्य करताना सपकाळ यांनी या निवडणुका लोकप्रियतेमुळे नव्हे, तर धमक्या, दबाव आणि पैशांच्या आमिषामुळे होत असल्याचा आरोप केला. या प्रक्रियेत पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोगाची अप्रत्यक्ष मदत होत असल्याचे दिसते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच, अंबरनाथमधील या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील राजकारण अधिक तापले असून, काँग्रेसने कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारत भाजपला थेट आव्हान दिले आहे.

