(मुंबई)
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. यासाठी आयोगाने मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार असून ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. मतदार याद्यांतील घोळावरून सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी गतीमान केली असून, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. आज जाहीर केलेल्या कार्यक्रमातून आयोगाने याला अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.
मतदार याद्यांबाबत आयोगाचे स्पष्टीकरण
मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातील. मात्र, नवीन नावांचा समावेश, नावे वगळणे किंवा नावे-पत्त्यांमध्ये दुरुस्ती अशी कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार नाही.
केवळ लेखनिकांच्या चुका, मतदाराचा निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण चुकून बदलणे, विधानसभा यादीत नाव असूनही प्रभाग यादीत नाव नसणे, या प्रकारच्या त्रुटी हरकती व सूचनांच्या कालावधीत दुरुस्त करता येतील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या तारखा
- १ जुलै २०२५ : अधिसूचित दिनांक. या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी निवडणुकीसाठी वापरली जाईल.
- ८ ऑक्टोबर २०२५ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध.
- १४ ऑक्टोबर २०२५ : हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत.
- २७ ऑक्टोबर २०२५ : अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर.
34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण खालीलप्रमाणे:
-ठाणे: सर्वसाधारण (महिला)
-पालघर: अनुसूचित जमाती
-रायगड: सर्वसाधारण
-रत्नागिरी: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
-सिंधुदुर्ग: सर्वसाधारण
-नाशिक: सर्वसाधारण
-धुळे: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
-नंदूरबार: अनुसूचित जमाती
-जळगाव: सर्वसाधारण
-अहिल्यानगर: अनुसूचित जमाती (महिला)
-पुणे: सर्वसाधारण
-सातारा: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
-सांगली: सर्वसाधारण (महिला)
-सोलापूर: नागरिकांचा मागास प्रवर्ग
-कोल्हापूर: सर्वसाधारण (महिला)
-छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण
-जालना: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
-बीड: अनुसूचित जाती (महिला)
-हिंगोली: अनुसूचित जाती
-नांदेड: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
-धाराशिव: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
-लातूर: सर्वसाधारण (महिला)
अमरावती: सर्वसाधारण (महिला)
-अकोला: अनुसूचित जमाती (महिला)
-परभणी: अनुसूचित जाती
-वाशिम: अनुसूचित जमाती (महिला)
-बुलढाणा: सर्वसाधारण
-यवतमाळ: सर्वसाधारण
-नागपूर: नागरिकांचा मागास प्रवर्ग
-वर्धा: अनुसूचित जाती
-भंडारा: नागरिकांचा मागास प्रवर्ग
-गोंदिया: सर्वसाधारण (महिला)
-चंद्रपूर: अनुसूचित जाती (महिला)
-गडचिरोली: सर्वसाधारण (महिला)
ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे 2022 पासून महाराष्ट्रात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निवडणूक प्रक्रिया गतीमान होण्याची अपेक्षा आहे.

