(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी शहराच्या विकास आराखड्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याचे अधोरेखित करणारी महत्त्वपूर्ण घटना घडली असून, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांना संयुक्त राष्ट्रांच्या मानव वस्ती कार्यक्रमाकडून (UN-Habitat) प्रतिष्ठित World Urban Forum 2026 परिषदेसाठी अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे. अझरबैजानची राजधानी बाकू येथे होणाऱ्या या जागतिक परिषदेत शहरी विकास, शाश्वत नागरीकरण आणि आधुनिक शहर नियोजन यावर चर्चा होणार आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या कार्यकारी संचालक कार्यालयातून पाठविण्यात आलेले हे निमंत्रण रत्नागिरीच्या विकास मॉडेलची जागतिक स्तरावर दखल घेतली गेल्याचे मानले जात आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे १८३० कोटी रुपयांच्या व्हिजन प्लानला मंजुरी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेतृत्वामध्ये मिलिंद कीर यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते. महाराष्ट्रातील मोजक्या प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश झाल्याने रत्नागिरीसाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
रत्नागिरी शहरात पायाभूत सुविधा, शहरी नियोजन आणि दीर्घकालीन विकास आराखड्यांवर भर देत राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे शहर विकासाच्या नव्या संकल्पनांना गती मिळाली होती. त्याच पार्श्वभूमीवर जागतिक परिषदेसाठी मिळालेले निमंत्रण हे केवळ वैयक्तिक सन्मान नसून रत्नागिरीच्या नागरी विकास दृष्टीकोनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली दखल असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अझरबैजानची राजधानी बाकू हे तेहरानपासून तुलनेने कमी अंतरावर असल्याने सुरक्षिततेचा विचार करून मिलिंद कीर यांनी प्रत्यक्ष परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ते या परिषदेत ऑनलाईन माध्यमातून सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

