(जाकादेवी/ संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा विल्ये, बौद्धजन विकास कमिटी, सावित्रीबाई फुले महिला मंडळ विल्ये येथे नव्याने उभारण्यात आलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराचे भव्य उद्घाटन व बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा शनिवार दि.१६ मे रोजी सकाळी १० वा. प्रख्यात पूज्य भंते डॉ.सुमेध बोधी व भिक्खू संघ यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उदय स.कांबळे भूषविणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष अनंत जाधव, तालुकाध्यक्ष सुनिल पवार, पाली पाथरट धम्मपदेस विपश्यना कोंकण सेंटरचे समन्वयक संतोष आयरे, बौध्दजन पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पवार, गावचे सरपंच स्वप्निल देसाई, उपसरपंच अभिषेक कांबळे, पोलीस पाटील रमेश कांबळे यांसह भारतीय बौद्ध महासभा गाव शाखांचे पदाधिकारी, महिला मंडळ, पंचक्रोशीतील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या गंधकुटी बुद्ध विहाराच्या भव्य उद्घाटन व लोकार्पण समारंभासाठी बौद्ध अनुयायी व भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा विल्ये,बौद्धजन विकास कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. विश्व शांतीदूत भगवान गौतम बुद्धांच्या वैज्ञानिक, धार्मिक, सामाजिक आणि समतावादी विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हे गंधकुटी बुद्ध विहार संस्कार केंद्र बनणार आहे.
या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने शनिवारी विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ८.३० वा. बुद्ध रूपाची सवाद्य मिरवणूक, धम्म ध्वजारोहण, स.१० वा. गंधकुटी बुद्ध विहाराचे नियोजित उद्घाटन व लोकार्पण सोहळा, बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना व बुद्ध पूजा व सूत्रपठण, मान्यवरांचे स्वागत स. ११.३० वा मान्यवरांच्या शुभेच्छा व मार्गदर्शन दु. १२ वा. प्रख्यात पुज्य भंते डॉ. सुमेध बोधी यांची धम्मदेसना दु. १ वाजता होणार आहे.
तद्नंतर गंधकुटी बुद्ध विहार उभारण्यासाठी बहुमोल योगदान व दानशूर देणगीदारांचा यथोचित सत्कार, दुपारी स्नेह भोजनानंतर सायं. ४ वाजता महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक, रात्री ९.३० वा. सुशांत जाधव मुंबई प्रस्तुत बुद्ध भीम गीतांचा भीम-बाणा वाद्य वृंद हा बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे.रविवार १७ मे रोजी विविध सांघिक खेळ, रात्री ८ वा. विद्यार्थी व महिलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न होणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौध्दजन विकास कमिटी विल्ये स्थानिक व मुंबई खूप मेहनत घेत आहे.

