( मुंबई )
महाराष्ट्रातील जुन्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना 1 जुलै 2026 पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविणे अनिवार्य केले आहे. वाहन सुरक्षा अधिक मजबूत करणे, बनावट नंबर प्लेट्सना आळा घालणे आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. राज्य परिवहन विभागाने यासंदर्भात स्पष्ट सूचना जारी केल्या असून वाहनधारकांनी 30 जून 2026 पूर्वी HSRP बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
HSRP नंबर प्लेट का महत्त्वाची?
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाहनांचा वापर रोखण्यासाठी HSRP ही अत्यंत महत्त्वाची प्रणाली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता जुन्या वाहनांनाही उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.” HSRP नंबर प्लेटमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असतात. या प्लेट्समध्ये टॅम्पर-प्रूफ लॉक, लेझर कोडिंग आणि क्रोमियम-आधारित होलोग्रामचा वापर केला जातो. त्यामुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होते.
1 जुलैनंतर विशेष तपासणी मोहीम
सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या वाहनधारकांनी मुदतीत HSRP बसवली नाही किंवा ऑनलाइन अपॉइंटमेंट नोंदवली नाही, त्यांच्यावर 1 जुलै 2026 पासून कारवाई करण्यात येईल. राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून वाहनांची पडताळणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. तसेच 1000 रुपयांपर्यंत कारवाई शुल्क आकारले जाऊ शकते.
वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी आगाऊ वेळ निश्चित करावी. अधिकृत वेबसाइटवरूनच नोंदणी करावी आणि कोणत्याही एजंट किंवा अनधिकृत व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही सरकारने केले आहे. राज्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन सुरक्षेच्या दृष्टीने HSRP प्रक्रिया गांभीर्याने घ्यावी आणि वेळेत नंबर प्लेट बसवून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

