सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह व्हिडिओ व फोटो समोर आले आहेत. हे फोटो बघून थरकाप उडेल अशा क्रूर पद्धतीने नराधमांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येचे एकूण 15 व्हिडिओ व 8 फोटो सीआयडीच्या हाती आले आहेत. मन विचलित करणारे हे असे फोटो आहेत. किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल, याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो. याच व्हिडीओचे स्क्रीनशॉर्ट घेऊन फोटोंचा चार्जशीटमध्ये समावेश करण्यात आला आहे. हे फोटो पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
अत्यंत क्रूर पद्धतीने नराधमांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. माझ्या भावाला झालेली भयावह मारहाण पाहून काळीज हेलावून गेलंय, खूप वेदना होत आहेत अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली. माझ्या भावाला खूप वेदना दिल्या गेल्या, आता त्या हरामखोरांवर काय कारवाई करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं अशी संतापजनक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
भावाच्या हत्येच्या वेळीचे फोटो पाहून त्यांचा भाऊ धनंजय देशमुख ढसाढसा रडायला लागले. संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दलचे पुरावे पहिल्यांदाच समोर आले आहे. १५ व्हिडीओ आणि ८ फोटो आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्यावेळी काढले होते. आरोपींचं सैतानी कृत्य पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या प्रकरणावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली, त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
‘जे आता समोर आलं आहे, ते खूप भयानक आहे. मी तुटून गेलो आहे. आज ८५ दिवस झाले आहे. आता काय व्यक्त व्हावं. याआधी संतोष देशमुख यांचे पोस्टमॉर्टमच्या वेळीही फोटो व्हायरल झाले होते. खूप त्याला त्रास दिला आहे. कधीच गावाने, कुटुंबाने त्रास दिला. हे सगळं पाहून मला टेन्शन येतंय मी माझ्या लेकरांना आता काय सांगू, खूप त्रास होत आहे’ असं म्हणत धनंजय देशमुख ढसाढसा रडले. माणुसकी जीवंत आहे की नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.
आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर आरोपी सेल्फी घेताना दिसत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटनंतर देशमुखांना क्रूरतेने संपवलेले फोटो समोर आले आहेत. यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे. वाल्मीक कराड हा संतोष संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मुख्य आरोपी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तो मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
चार्टशिटमध्ये नावे
सीआयडीने दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये हत्येच्या कटात वाल्मीक कराड, दोन विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, फरार कृष्णा आंधळेचा अशा आठ जणांचा क्रमवार समावेश करण्यात आला आहे. सिद्धार्थ सोनवणे याचे नाव त्यातून वगळण्यात आले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्धचे सबळ पुरावे सापडल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे.