( नवी दिल्ली )
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ध्वज असलेल्या ‘हाजी अली’ या व्यापारी जहाजावर स्ट्रेट ऑफ होर्मुजजवळ संशयित ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. स्फोटानंतर जहाजाला भीषण आग लागली आणि काही वेळातच ते समुद्रात बुडाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर भारताने तीव्र संताप व्यक्त करत व्यापारी जहाजांवरील हल्ले “अस्वीकार्य” असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अली जहाज ओमानच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ, लिमा (Limah) जवळून जात असताना हा हल्ला झाला. ‘हाजी अली’ हे भारतीय नोंदणीकृत जहाज सोमालियातून संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहकडे जात होते. ओमान किनाऱ्याजवळ जहाजावर अचानक स्फोट झाला. त्यानंतर जहाजाच्या इंजिन विभागात आग लागली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने जहाज अखेर समुद्रात बुडाले.
सर्व 14 खलाशी सुरक्षित
या हल्ल्यानंतर जहाजावरील 14 खलाशांनी तातडीने मदतीचा संदेश पाठवला. ओमान कोस्ट गार्डने तत्काळ बचाव मोहीम राबवत सर्व खलाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांना डीबा बंदरात हलवण्यात आले असून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “भारतीय जहाजांवर आणि नागरी खलाशांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत,” असे मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारताने केली आहे.
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) फुजेराह बंदराजवळ नांगर टाकून उभ्या असलेल्या एका व्यापारी जहाजावर अज्ञात व्यक्तींनी ताबा मिळवल्यानंतर ते जहाज इराणच्या सागरी हद्दीकडे नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटनची सागरी सुरक्षा यंत्रणा युनायटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. UKMTO च्या अहवालानुसार, फुजेराह बंदरापासून सुमारे 38 नॉटिकल मैल ईशान्य दिशेला हे जहाज उभे होते. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी जहाजाचा ताबा घेतला. यानंतर जहाजाला इराणच्या सागरी हद्दीकडे वळवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र संबंधित जहाजाचे नाव, मालक किंवा त्यावरील कर्मचाऱ्यांची माहिती अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
या घटनेमुळे आखाती प्रदेशातील सागरी सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुज आणि फुजेराह परिसरात अलीकडच्या काळात व्यापारी जहाजांवरील हल्ले, ड्रोन कारवाया आणि ताबा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय समुदाय सतर्क झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संबंधित देशांच्या सागरी सुरक्षा यंत्रणांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे
स्ट्रेट ऑफ होर्मुज पुन्हा धोक्याच्या केंद्रस्थानी
स्ट्रेट ऑफ होर्मुज हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापार मार्गांपैकी एक मानला जातो. जागतिक तेल आणि गॅस वाहतुकीपैकी मोठा हिस्सा या मार्गातून होतो. त्यामुळे या परिसरातील वाढते हल्ले जागतिक व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि सागरी सुरक्षेसाठी मोठा धोका मानले जात आहेत.
भारतीय नौदल सतर्क
या घटनेनंतर भारतीय नौदल आणि सागरी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आखाती प्रदेशात तैनात भारतीय जहाजांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अतिरिक्त सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान, भारताकडे येणाऱ्या काही एलपीजी टँकर्सनी तणावपूर्ण परिस्थितीतही स्ट्रेट ऑफ होर्मुज पार केल्याची माहिती समोर आली आहे.

