(मुंबई)
नाशिकमधील स्वयंघोषित धर्मगुरू अशोक खरात याच्याविरोधातील कथित मनी लॉन्डरिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी चौकशी केली. ईडीने त्यांना सकाळी 11 वाजता मुंबईतील वरळी येथील कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यानुसार चाकणकर सकाळी साडेदहा वाजता ईडी कार्यालयात दाखल झाल्या.
चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, “ईडीने चौकशीसाठी बोलावले म्हणून मी आले आहे. अनेक बातम्यांमधून विपर्यास केला गेला आहे. आज जबाब नोंदवणे आणि टायपिंग करण्यातच बराच वेळ गेला. यापुढे पुन्हा चौकशीसाठी बोलावले तरी मी तपासाला पूर्ण सहकार्य करेन.”
“अशोक खरात प्रकरणाशी माझा संबंध नाही”
पुढे त्यांनी म्हटलं की, “11 ते 7 ही वेळ आहे. याच्यात 4 ते 4.30 तास चौकशी झाली. याच्यात जबाब नोंदवणं, टाइप करणं, लिहून घेणं, लंच ब्रेक असा काळ होता. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. पहिल्या दिवशी सांगितलं, तेच आजही सांगते. अशोक खरातशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता. कोणत्याही जमिनीत आम्ही भागीदार नव्हतो. त्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाहीत”. समता पतसंस्थेबाबतच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, “ज्या खात्यांबाबत चर्चा सुरू आहे ती बनावट खाती होती. त्या पतसंस्थेशी माझ्या बहिणीचा कोणताही संबंध नाही.”
“समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावे खाती उघडली ती बनवाट होती. ते कधीही समता पतसंस्थेत गेलेले नाहीत. त्यांना संस्था कुठे आहे हेदेखील माहिती नाही. त्याचा ओटीपी खरातकडे जात होते. या दोघांच्याही खात्यात कुठे सह्या नव्हत्या. जवळपास 125 ते 150 लोकांची बनावट खाती काढली आहेत अशी माझी माहिती आहे. ज्यांना चालता येत नाही त्यांचीही खाती काढली आहेत. ही खाती खोटी आहेत. आमचा खरातशी कोणताही आर्थिक किंवा जमिनीचा व्यवहार नाही,” असा दावा त्यांनी केला.
गुवाहाटी दौऱ्यावरही दिले स्पष्टीकरण
गुवाहाटी दौऱ्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना चाकणकर म्हणाल्या, “खरात यांचे कुटुंब आधी गेले होते. त्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबासोबत दर्शनासाठी गेलो होतो. आम्ही त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेलो नव्हतो. अनेकांची जशी श्रद्धा होती, तशी आमचीही होती. त्यानंतर खरात प्रकरण समोर आले होते.”
अशोक खरातवर गंभीर आरोप
दरम्यान, अशोक खरात याच्यावर लैंगिक शोषण, खंडणी, फसवणूक, अंधश्रद्धा पसरवणे आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात ईडीने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड, दागिने आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या तपासात अशोक खरातशी संबंधित विविध सहकारी पतसंस्थांमधील संशयास्पद व्यवहार, प्रॉक्सी किंवा बनावट खात्यांचे जाळे आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. काही अहवालांनुसार 2022 ते 2024 या कालावधीत 70 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे समोर आले आहे.
ट्रस्टमधील भूमिकेचीही पडताळणी
रूपाली चाकणकर या शिवनिका संस्थान ट्रस्टच्या विश्वस्त असल्याने ईडीकडून त्यांच्या भूमिकेची, ट्रस्टमधील आर्थिक व्यवहारांची तसेच अशोक खरात यांच्याशी कोणतेही आर्थिक संबंध होते का, याची पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

