(राजापूर / तुषार पाचलकर)
सातबारा उताऱ्यावर पतीचे नाव दाखल करून फेरफार मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील मंडळ अधिकारी आणि कोतवाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आज (गुरुवारी) झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये तलाठी सजा मिळंद येथील कोतवाल श्रीमती संजना नंदकुमार माने (वय ४१) आणि तळवडे मंडळ अधिकारी श्रीमती पुनम जससिंग गावीत (वय ३७) यांचा समावेश आहे.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मौजे जवळेथर (ता. राजापूर) येथील वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पतीचे नाव नमूद नसल्याने नाव दाखल करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जाच्या चौकशीदरम्यान १३ मे रोजी तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय मिळंद येथे कोतवाल संजना माने यांची भेट घेतली. त्यावेळी मंडळ अधिकारी पुनम गावीत यांच्या वतीने फेरफार मंजूर करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तक्रारदारांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर आज (१४ मे) रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात तडजोडीनंतर २० हजार रुपये लाच घेण्याचे निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने तातडीने सापळा रचला.
सापळा कारवाईदरम्यान कोतवाल संजना माने यांनी तलाठी कार्यालय मिळंद येथे पंचासमक्ष तक्रारदारांकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी पुनम गावीत यांना फोन करून रक्कम मिळाल्याची माहिती दिली. गावीत यांनी त्यास संमती दर्शवल्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघींनाही ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे, सहाय्यक पोलीस फौजदार उदय चांदणे, पोलीस हवालदार विशाल नलावडे, दीपक आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, राजेश गावकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली धनवडे, समिता क्षिरसागर आणि चालक पोलीस हवालदार प्रशांत कांबळे यांच्या पथकाने केली. या कारवाईस पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, अॅन्टी करप्शन ब्युरो, रत्नागिरी यांनी नागरिकांना आवाहन केले असून, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने कोणी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा, असे म्हटले आहे.

