(मुंबई / रामदास गमरे)
जगात प्रथमच पाण्याला आग लावून समाजातील विषमतावादाला मातीत गाडून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड क्रांतिभूमीत मिळवून दिला, त्या ऐतिहासिक घटनेस १०० वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणूनच हा शतकोत्सव देश विदेशातील विविध संघटनांच्या मान्यवरांना निमंत्रित करून त्यांना सोबत घेऊन बौद्धजन पंचायत समितीच्या अधिपत्याखाली आयोजित करण्याचे योजले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्या ज्या लोकांनी या सत्याग्रहात मदत केली त्यांच्या वारसदारांना बोलवून सन्मानित करणे, परिषदा आयोजित करणे, मेळावा घेणे असे अनेकविध उपक्रम आपण वर्षभरात राबविणार आहोत याकरता सर्व शाखा पदाधिकाऱ्यांची आम्हाला साथ हवी आहे” असे आवाहन बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, इंदू मिलचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी संवाद मेळाव्यात बोलत असताना केले.
संवाद मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना आनंदराज आंबेडकरांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच देशातील पहिलं स्मारक आपल्या श्रमातून आपण निर्माण करीत आहोत त्यासाठी आपण जे अमूल्य योगदान दिले, इंदू मिलची ही जागा आपण आपल्या ताकदीवर मिळवली ते सर्व तुमच्या सर्वांच्या मदतीमुळे झाला तरी महाड क्रांतीभूमीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण मला व बौद्धजन पंचायत समितीला साथ द्यावी, आमचे हाथ बळकट करावे, आपण आताच कामाला लागून घेतले कार्य पुर्णत्वास नेण्यास आम्हाला सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो. धम्माला किंवा सामाजिक संस्थेला राजाश्रय असल्याशिवाय तो धम्म किंवा सामाजिक संस्था गतिशील होत नाही हाच धागा धरून मी माझ्या बौद्धजन पंचायत समितीचा कार्यकर्ता हा नगरसेवक, आमदार व्हावा त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी जागा मिळावी, या माझ्या स्वप्नाला मूर्तरुपात आणण्यासाठी मी पक्षाच्या वतीने शिवसेनेशी युती केली आहे, आज राजकारणातील परिस्थिती पाहता देशातील कोणत्याही पक्षाला युती केल्याशिवाय पर्याय नाही. आपला समाज अल्पप्रमाणात मोडतो बौद्धजन पंचायत समितीची मोठी ताकद असून ती वाया जाऊ नये, समाजाच्या हितासाठी, कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी मी युती करण्याचा प्रयोग करीत आहे. बौद्धजन पंचायत समिती ही सामाजिक संघटना असून त्यात राजकारण येता कामा नये याच मला भान आहे परंतु कोणी जाणूनबुजून गैरसमज पसरवत असेल, अफवा पसरवत असतील तर त्यापासून आपण सावध राहिले पाहिजे, बौद्धजन पंचायत समिती ही सामाजिक संघटना अबाधित राहूनच आपल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना मुख्यप्रवाहात आणण्याचा आपला प्रयत्न आहे” असे आपले मत स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद जाधव यांनी केले. बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती व संवाद मेळाव्याचे अध्यक्ष विनोद मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात “मुंबईतील १२ महानगरपालिका, नगरपालिका यामध्ये फक्त आपल्या कोकणस्थ बांधवांचे मतदान किती आहे याची आकडेवारी अभ्यासपूर्वक मांडून आपले नगरसेवक किती येऊ शकतील याचे अंदाजपत्रक सादर केले, म्हणून आपल्या समाजातील कार्यकर्ता खऱ्या अर्थाने मुख्य राजकीय प्रवाहात येऊन सत्तेच्या केंद्रस्थानी आला तर तो संधीच सोन करेल म्हणून आपण सरसेनानी आनंदराज आंबेकरांना मदत केली पाहिजे” असे मत व्यक्त केले. सदर प्रसंगी कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, दक्षिण मुंबईचे अध्यक्ष भगवान साळवी, विठ्ठल जाधव, मनोहर मोरे, प्रकाश कासे, महेंद्र पवार, अशोक कांबळे आदींनी आपले शुभेच्छापर विचार व्यक्त केले. संदीप लोखंडे विभाग क्र. १/२५०, विकास पवार, दीपक कांबळे विभाग क्र.२, शाखा क्र. २८/ २६५, किशोर कांबळे विभाग क्र. ४, शाखा क्र. २६४, विभाग कोषाध्यक्ष प्रविण तांबे विभाग क्र. १३, शाखा क्र.२१६ आणि इतर सतरा विभागातील मान्यवर कार्यकर्त्यांनी युतीचे स्वागत करून आनंदराज आंबेडकरांनी केलेल्या आवहानाल विभागांच्या वतीने पाठिंबा जाहीर केला.
सरतेशेवटी स्थानिक गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी सदर संवाद मेळावा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच मेळाव्याला सतरा विभागातील उपस्थित मान्यवर कार्यकर्त्यांचे व सर्वांचे आभार मानून संवाद मेळाव्याची सांगता केली.

