(मुंबई / वृत्तसंस्था)
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी घेण्यात येणाऱ्या २१ सामाईक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा विद्यार्थ्यांना ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी देण्याची संधी मिळणार असून, पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंग या तीन अभ्यासक्रमांसाठी प्रथमच स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. जानेवारी २०२७ मध्ये परीक्षांना सुरुवात होणार असून, १० जून २०२७ पर्यंत संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पार पडणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रीय स्तरावरील जेईई मेन परीक्षेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेत अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षापासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए/एमएमएस या तीन अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा घेण्याची पद्धत सुरू करण्यात आली होती. या प्रयोगाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा आणखी आठ अभ्यासक्रमांचा या व्यवस्थेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता एकूण ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा घेण्यात येणार आहेत.
या व्यवस्थेत पीसीएम, पीसीबी, एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम, पाच वर्षीय एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना पहिली सीईटी देणे अनिवार्य असून, दुसऱ्या परीक्षेला बसणे ऐच्छिक ठेवण्यात आले आहे. दोन्ही परीक्षा दिल्यास ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाइल गुण मिळतील, तेच गुण प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळणाऱ्या संधींची संख्या वाढणार आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या २० सीईटी परीक्षांसाठी एकूण १८ लाख १४ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख ३१ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती.
यंदाच्या वेळापत्रकातील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे तीन व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी घेण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम), पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (पीजीसीएम) आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (जीएनएम) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा आयोजित केली जाणार आहे. पीजीडीएम आणि पीजीसीएमच्या परीक्षा एमबीए सीईटीसोबतच दोन वेळा घेतल्या जाणार आहेत.
दुसरीकडे, राज्यात केवळ एका संस्थेत सुरू असलेल्या तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या एकूण ५५ जागांपैकी यंदा केवळ १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने या वर्षी त्यासाठी सीईटी आयोजित केली जाणार नाही. तसेच विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांकडून करण्यात आलेल्या मागणीचा विचार करून बीएड, एमएड आणि एमपीएड या अभ्यासक्रमांच्या परीक्षा यंदा जून महिन्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दोन संधी उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांच्या संभाव्य वेळापत्रकानुसार, एमबीए, एमएमएस, पीजीडीएम आणि पीजीसीएम या अभ्यासक्रमांची पहिली परीक्षा २८ ते ३० जानेवारी २०२७ या कालावधीत, तर दुसरी परीक्षा १ ते ३ एप्रिल २०२७ दरम्यान होणार आहे. पाच वर्षीय एलएलबीची पहिली सीईटी २८ व २९ मार्च २०२७ रोजी आणि दुसरी परीक्षा २४ मे २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
पीसीबी ग्रुपची पहिली परीक्षा ८ ते १३ एप्रिल २०२७ या कालावधीत, तर दुसरी परीक्षा ६ ते ८ मे २०२७ दरम्यान होईल. पीसीएम ग्रुपची पहिली सीईटी १६ ते २६ एप्रिल २०२७ आणि दुसरी सीईटी १० ते १५ मे २०२७ या कालावधीत घेतली जाणार आहे. बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांची पहिली परीक्षा २८ ते ३० एप्रिल २०२७ दरम्यान, तर दुसरी परीक्षा २७ व २८ मे २०२७ रोजी होणार आहे.
इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचेही संभाव्य वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मार्च महिन्यात २४ मार्च रोजी एम.एचएमसीटी आणि २७ मार्च रोजी एमसीएची परीक्षा होणार आहे. एप्रिलमध्ये ११ एप्रिल रोजी एएसी- कला शिक्षण आणि १८ एप्रिल रोजी बी. डिझाईनची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
मे महिन्यात ४ व ५ मे रोजी तीन वर्षीय एलएलबीची परीक्षा होईल. त्यानंतर १८ मे रोजी डीपीएन/पीएचएन आणि १८ व १९ मे रोजी नर्सिंगची परीक्षा घेतली जाणार आहे. जीएनएम-नर्सिंगची सीईटी २१ व २२ मे २०२७ रोजी होणार आहे.
जून महिन्यात एमपीएडची परीक्षा ५ जून, एमएडची परीक्षा ६ जून रोजी होणार आहे. बीएड (जनरल व स्पेशल), बीएड (इएलसीटी) आणि बीपीएड या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ८ ते १० जून २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सीईटी सेलने जाहीर केलेले हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या अंतिम तारखा, प्रवेश प्रक्रियेचे तपशील आणि अन्य अधिकृत सूचनांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


