(कल्याण / ठाणे)
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात संघटित पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटविरोधात कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा महिला आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू केला आहे. या प्रकरणातील तीन पुरुष आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यावरही मोक्काअंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली.
महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने 21 फेब्रुवारी 2026 रोजी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वेश्याव्यवसायाविरोधात विशेष कारवाई केली होती. या कारवाईत सहा महिलांना अटक करण्यात आली होती. तपासात या आरोपींकडून 20 पीडित महिलांकडून जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आरोपी स्वतःचा उदरनिर्वाह करत असल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
पिटानंतर आता मोक्काअंतर्गत कारवाई
या प्रकरणात सुरुवातीला आरोपींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपींविरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरूपाचे दोन ते तीन गुन्हे नोंद असल्याने संघटित गुन्हेगारीचा आधार घेत पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का लावण्याचा निर्णय घेतला.
अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना 30 जून रोजी त्यांना पुन्हा पोलिस ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात मोक्का लावल्यावर त्यांना ठाण्यातील मोक्का न्यायालयासमाेर हजर केले. त्यांना मोक्का न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर ६ जुलै रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
20 पीडित महिलांची सुटका
गेल्या दीड महिन्यांपासून महात्मा फुले पोलीस ठाण्याने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तपासात आर्थिक अडचणीत असलेल्या आणि गरजू महिलांना आमिष दाखवून किंवा इतर मार्गांनी वेश्याव्यवसायात ढकलले जात असल्याची माहिती समोर आली.
स्टेशन परिसरातील महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फूटपाथ, स्कायवॉक आणि सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी वेश्याव्यवसायामुळे सर्वसामान्य महिला प्रवाशांना अश्लील शेरेबाजी आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे या रॅकेटविरोधात केवळ पिटाअंतर्गत नव्हे तर मोक्काअंतर्गत कारवाई केल्याने या अवैध व्यवसायाला मोठा आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलराम सिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजय नाईक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ यांच्या पथकाने केली. दरम्यान, फरार असलेल्या तीन आरोपींचा शोध सुरू असून त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

