( मुंबई )
महापालिका निवडणुकीतील युती आणि आघाड्यांमुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकांमुळे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून, नाराजी नियंत्रणात ठेवणे पक्षांसाठी अवघड ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर अधिकृत उमेदवारांच्या याद्या जाणीवपूर्वक लांबवण्याची रणनीती सर्व पक्षांनी स्वीकारली आहे.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 30 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असतानाही प्रमुख पक्षांनी जागावाटप आणि उमेदवार घोषणेचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. शेवटच्या क्षणी यादी जाहीर करून बंडखोरांना आवरण्यात यश मिळेल, असा पक्षांचा अंदाज आहे.
मुंबई, ठाण्यासह प्रमुख महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र निवडणूक लढवत आहेत. या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. युतीमुळे अनेकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असून, उमेदवारी न मिळाल्यास शिंदे गटाची शिवसेना किंवा भाजपमध्ये जाण्याचा पर्याय अनेक जण खुलेपणाने विचारात घेत आहेत. संभाव्य बंडखोरी लक्षात घेऊन दोन्ही ठाकरे बंधूंनी जागावाटप आणि उमेदवारांची नावे गुप्त ठेवली आहेत. काही निवडक उमेदवारांना मात्र तयारी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीनेही उमेदवारांची यादी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आणि शिंदे गटालाही मुंबईत अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतील काही प्रभावी इच्छुक उमेदवार महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप-शिंदे गटाचे लक्ष ठाकरे बंधूंच्या उमेदवार यादीकडे लागले आहे.
भाजपची उमेदवार यादी दिल्लीत अंतिम होणार असल्याने ती जाहीर होण्यास विलंब होणार आहे. काँग्रेस मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवत असून, काँग्रेसची उमेदवार यादीही दिल्लीहूनच निश्चित होणार आहे. उमेदवार जाहीर करण्यात शेवटपर्यंत घोळ ठेवण्याची काँग्रेसची जुनी परंपरा आहे. मुंबईतील काही प्रभागांत काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने, इतर पक्षांतील इच्छुक किंवा बंडखोरांना काँग्रेसच्या चिन्हावर उभे करण्याचीही रणनीती आखण्यात आली आहे.
एकूणच महापालिका निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवार याद्या उशिरा जाहीर करण्याची सावध भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतल्याचे स्पष्ट चित्र आहे.

