(दापोली /रत्नागिरी प्रतिनिधी)
लहानपणापासून हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दापोली तालुक्यात घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुष्मिता बिसाल मगर असे मृत मुलीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुष्मिता बिसाल मगर (वय १३) हिला बालपणापासून हृदयाचा गंभीर आजार होता. सन २०१४ मध्ये तिच्यावर हृदयाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. दरम्यान, ११ मे २०२६ रोजी तिला उलट्यांचा त्रास होत असल्याने तिने दिवसभर अन्न सेवन केले नव्हते. रात्री सुमारे दोन वाजण्याच्या दरम्यान तिचे वडील बिसाल रमेश मगर यांनी झोपलेल्या सुष्मिताला उठविण्याचा प्रयत्न केला असता तिच्याकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर पहाटे ३.५६ वाजता तिला मृत घोषित केले.
सुष्मिता मगर ही टेटेवली ब्राम्हणवाडी, ता. दापोली येथे राहत होती. तिचे मूळ गाव नेपाळमधील शालाखडी आडबिस कोट परिसर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून दापोली पोलीस ठाण्याचे पोलिस पुढील कार्यवाही करीत आहेत.

