(राजापूर)
तालुक्यातील नाटे येथील गॅस एजन्सीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या सात जणांना रत्नागिरी सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता दिली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये घडलेल्या या घटनेने त्या काळात राजापूर तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली होती.
स्वप्नील गजानन गोठणकर (रा. राजापूर) यांनी या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
निर्दोष मुक्त झालेले आरोपी:
राजेश वासुदेव गावकर (३०), समिक्षा राजेश गावकर (२४), वासुदेव महादेव गावकर (६२), स्वप्ना वासुदेव गावकर (५३), योगेश वासुदेव गावकर (५३, सर्व रा. अणसुरे, ता. राजापूर), तसेच सचिन मधुकर वाघधरे (५२) आणि सुरज सचिन वाघधरे (२६, दोघे रा. माडबन, ता. राजापूर).
या खटल्याचा निकाल रत्नागिरी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी दिला, तर आरोपींच्या वतीने ॲड. मच्छींद्र आंब्रे यांनी बाजू मांडली.
तक्रारदार स्वप्नील गोठणकर यांच्या नाटे येथील गॅस एजन्सीबाबत आर्थिक व्यवहारामुळे वाद निर्माण झाला होता. गोठणकर यांनी राजेश गावकर यांच्याकडून एजन्सी परत ताब्यात घेतल्याने दोघांमध्ये तणाव वाढला. २२ सप्टेंबर २०२१ रोजी राजेश गावकर यांनी एजन्सीच्या कार्यालयाला आणि गोडाऊनला टाळे ठोकले. दोन दिवसांनंतर, २४ सप्टेंबर रोजी गोठणकर हे टाळे काढण्यासाठी गेले असता, आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मात्र, सुनावणीदरम्यान सरकारी पक्ष आरोपींविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरला. परिणामी, न्यायालयाने सर्व सात आरोपींना महत्त्वपूर्ण पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला.

