(खेड/ रत्नागिरी)
खेड तालुक्यातील धवडे देवुळवाडी येथे एका नवविवाहित महिलेचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जान्हवी गुरुनाथ जाधव (वय २४) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुनाथ भार्गुराम जाधव हे आंब्याच्या बागेत काम करत असताना त्यांचे चुलत भाऊ प्रकाश चंदू जाधव यांनी घरी तातडीने येण्यास सांगितले. घरी आल्यानंतर पत्नी जान्हवी ही घरासमोरील सभामंडपात चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर गुरुनाथ जाधव यांनी तातडीने पत्नीला रिक्षातून प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवली येथे उपचारासाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी खेड येथे हलविण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार जान्हवी जाधव यांना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी व ईसीजी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. जान्हवी जाधव या नवविवाहित असून त्यांच्या अकस्मात निधनाने धवडे देवुळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

