(रत्नागिरी / वार्ताहर)
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि विशेषतः रात्रीच्या वेळी मालवाहतूक वाहनांची दृश्यमानता वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात ‘MISSION TAPE for SAFE – Accident Prevention’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ट्रक, डंपर आणि इतर जड मालवाहतूक वाहनांवर रेडियम रिफ्लेक्टिव्ह टेप, क्रमांक फलक (नंबर प्लेट) तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या.
रात्री अथवा कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत जड वाहनांची ओळख लवकर व्हावी, मागून येणाऱ्या वाहनचालकांना योग्य अंतर राखता यावे आणि संभाव्य अपघात टाळता यावेत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. रिफ्लेक्टिव्ह टेपमुळे वाहनांचे मागील व बाजूचे भाग दूरवरूनही स्पष्टपणे दिसत असल्याने रस्ते सुरक्षेला मोठी मदत होणार आहे.
या अभियानादरम्यान संबंधित वाहनधारक व चालकांनाही वाहतूक नियमांचे पालन, वाहनांची नियमित तपासणी, परावर्तित चिन्हांचा वापर आणि सुरक्षित वाहनचालना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर धावणाऱ्या मालवाहतूक वाहनांवर या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
रस्ते सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असून, अशा उपक्रमांमुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास आणि वाहनचालकांसह सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस प्रशासन जिल्हाभर राबवित असलेल्या या उपक्रमाचे वाहनचालक व नागरिकांकडूनही स्वागत करण्यात येत आहे.

