(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात साखरपा नजीक गोरेवाडी बसथांब्यासमोर एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. टायर पंक्चर झाल्याने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला लांजा आगाराच्या एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. आज (शुक्रवारी) पहाटे ४.४५ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात एसटीच्या वाहकासह एकूण नऊ प्रवासी जखमी झाले. पहाटेच्या शांततेत झालेल्या या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तोंडवली येथील विलास रामचंद्र बोभाटे हे एमएच ०७ एजे ६५५८ क्रमांकाचा आयशर टेम्पो घेऊन कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जात होते. गोरेवाडी बसथांब्यासमोर त्यांच्या टेम्पोच्या पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक पंक्चर झाला. त्यामुळे त्यांनी टेम्पो महामार्गाच्या कडेला उभा केला होता. त्याचवेळी लांजा आगाराची एमएच १४ एमएच ४८३५ क्रमांकाची धाराशिव-लांजा एसटी बस घेऊन चालक जितेंद्र संभाजी पाटील प्रवास करत होते. गोरेवाडी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोच्या मागील उजव्या बाजूला एसटी बसने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसमधील प्रवाशांना मोठा हादरा बसून अनेक जण जखमी झाले.
या अपघातात एसटी बसचे वाहक रोकडेश्वर पिराजी तोटेवाड, फुलाजी बत्तलवाड आणि वैष्णवी बत्तलवाड (सर्व रा. लांजा) यांच्यासह अन्य प्रवासी असे एकूण नऊ जण जखमी झाले. अपघाताची माहिती ११२ क्रमांकावर मिळताच साखरपा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सुजित पाटील आणि पोलीस वाहनचालक स्वप्नील कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व जखमींना पोलीस वाहनातून साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारांसाठी जखमींना रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताची नोंद साखरपा पोलिसांनी घेतली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.


