(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले असून, या फेरबदलात रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आकांक्षा यादव यांची लातूर जिल्ह्यातील औसा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) कार्यरत असलेले संकेत सतीश गोसावी यांची रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी पोलीस उपविभागाच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल होणार आहे.
गृह विभागाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक एकच्या शिफारशीनुसार राज्यातील १६ वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि राज्य पोलीस सेवा (आरपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आकांक्षा यादव या २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०२२ मधील नागरी सेवा परीक्षेत त्यांनी देशात २०१ वा क्रमांक मिळवला होता. मूळच्या हरियाणातील असलेल्या यादव यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) पदव्युत्तर शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षेतील यशानंतर त्यांची भारतीय पोलीस सेवेत निवड झाली. प्रारंभी त्यांना गुजरात केडर मिळाले होते. मात्र, महाराष्ट्र केडरमधील २०२१ बॅचचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांच्याशी विवाह झाल्यानंतर केंद्र सरकारने जून २०२५ मध्ये त्यांची गुजरातमधून महाराष्ट्र केडरमध्ये बदली मंजूर केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात सेवा सुरू केली.
कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून प्रशिक्षणार्थी कार्यकाळात त्यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवायांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर रत्नागिरी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळताना अंमली पदार्थांविरोधातील कारवाईसोबतच सामाजिक जनजागृतीवरही भर दिला. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्ती अभियान राबवून तरुणाईला व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. गोवा बनावटीच्या अवैध मद्यतस्करीविरोधातील कारवायांमध्येही त्यांनी सहभाग नोंदविला. आता आकांक्षा यादव यांची औसा येथे बदली झाल्यानंतर रत्नागिरी उपविभागाची जबाबदारी संकेत सतीश गोसावी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गोसावी हे यापूर्वी पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत होते. तेथून त्यांची रत्नागिरी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील अन्य बदल्यांमध्ये ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ठाणे शहराच्या परिमंडळ क्रमांक एकच्या पोलीस उपायुक्त मीना मखवाना यांची नियुक्ती झाली आहे. तसेच जयंत बजबळे यांची ठाणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, परिमंडळ क्रमांक पाचचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि कोकण परिक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शिवराज पाटील यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
रत्नागिरीला नवे उपविभागीय पोलीस अधिकारी
पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) कार्यरत असलेले संकेत सतीश गोसावी यांची रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आकांक्षा यादव यांच्या औसा येथील बदलीनंतर गोसावी यांच्याकडे रत्नागिरी उपविभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


