(संगमेश्वर / प्रतिनिधी)
जोरदार वारा आणि झाडांच्या फांद्या पडल्याने खंडित झालेला मुचरी-तेर्ये परिसरातील सुमारे ५०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सलग पाच दिवस राबून पूर्ववत केला. या नैसर्गिक आपत्तीत तब्बल ४० विद्युत खांब कोसळले होते, तर आठ रोहित्र बंद पडले होते. दिवाळी आणि भाऊबीजेचा सण सुरू असतानाही स्वतःच्या आनंदापेक्षा ग्राहकांच्या घरात पुन्हा वीज पोहोचविण्याला प्राधान्य देत महावितरणच्या ५० जणांनी रात्रंदिवस मेहनत घेतली.
रविवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि झाडांच्या फांद्या पडल्याने मुचरी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे मौजे तेर्ये येथील टाकेवाडी, कापलेवाडी, दळवीवाडी, भुरवणेवाडी आणि बौद्धवाडी, तसेच मौजे मुचरीतील मोरवाडी, सुर्वेवाडी, गोरेवाडी, चांदेवाडी आणि गवळीवाडी येथील वीजपुरवठा ठप्प झाला. याशिवाय आयडिया टॉवर आणि पाणीपुरवठा योजनांचाही वीजपुरवठा खंडित झाला. सणासुदीच्या दिवसांतच अंधारात राहण्याची वेळ आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता फारूक गवंडी यांनी तातडीने दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी स्वीकारली. घनदाट जंगल आणि झाडीमधून जाणारी ही वीजवाहिनी गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून कार्यरत होती. त्यामुळे कोसळलेले ४० खांब पुन्हा उभारणे, त्यांना ताणे मारणे, वीजवाहिन्या ओढणे आणि मार्गातील झाडेझुडपे हटविणे, अशी अनेक आव्हाने कर्मचाऱ्यांसमोर होती.
कामाला वेग देण्यासाठी संगमेश्वर येथील महावितरणचे ठेकेदार सागर भावे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून लांजा आणि चिपळूण येथील ठेकेदारांची मदत घेतली. चार गँगमधील ४० कामगार आणि महावितरण संगमेश्वरचे १० जनमित्र अशा एकूण ५० जणांनी सलग पाच दिवस अहोरात्र काम केले. दिवाळीचा सण आणि कुटुंबासोबतचा आनंद बाजूला ठेवून या सर्वांनी वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
या दुरुस्ती मोहिमेत महावितरणचे जनमित्र रवी कदम, ओंकार कळंबटे, किशोर लाड, अंकेश गेले, राहुल धनावडे, विश्वनाथ जोशी, विलास भरणकर, अक्षय खानविलकर, किरण मोरे, विनिल काष्टे आणि रमेश कदम यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुचरीच्या सरपंच सौ. रंजना जाधव यांच्यासह ग्रामस्थ विलास सुर्वे, जगन्नाथ गोरे आणि सुनील जाधव यांनीही कामात सातत्याने सहकार्य केले. वीजवाहिनीच्या मार्गातील झाडे तोडणे आणि इतर आवश्यक कामांसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने दुरुस्ती मोहिमेला मोठी मदत झाली.
सामान्यतः अशा स्वरूपाचे काम पूर्ण करण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असते. मात्र महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे अवघ्या पाच दिवसांत ४० विद्युत खांब उभारून परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. सणासुदीच्या काळात अंधारात राहिलेल्या ग्रामस्थांच्या घरांत पुन्हा वीज आल्याने नागरिकांनी महावितरणचे, विशेषतः प्रभारी उपकार्यकारी अभियंता फारूक गवंडी यांचे आभार मानले.
जुन्या वीजवाहिन्या बदलण्यासाठी विशेष निधीची आवश्यकता
संगमेश्वर तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असून महावितरणच्या अनेक वीजवाहिन्या डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलातून जातात. तालुक्यातील बहुतांश विद्युत खांब आणि वीजवाहिन्या ४० ते ४५ वर्षांपूर्वी उभारण्यात आल्या असून सध्या त्या जीर्ण अवस्थेत आहेत. त्यांचे अपेक्षित आयुष्यमान संपल्याने जुन्या वाहिन्या आणि खांब टप्प्याटप्प्याने बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पूर्वी शेतजमिनींमधून टाकण्यात आलेल्या वीजवाहिन्यांच्या परिसरात आता शेतीचे प्रमाण कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात जंगली झाडेझुडपे वाढली आहेत. परिणामी, वीजपुरवठ्यात बिघाड झाल्यास दुरुस्ती पथकांना घटनास्थळी पोहोचणेही कठीण होत आहे.
भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी विशेष योजना आखून जीर्ण झालेले विद्युत खांब आणि वीजवाहिन्या बदलणे आवश्यक आहे. तसेच शक्य असेल त्या ठिकाणी वीजखांब रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करण्याची गरज आहे. यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, ही मागणी या घटनेच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.


