(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील देवरुख आणि लांजा परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत दोन गुन्हे दाखल केले आहेत. मुख्य रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने पोलिसांनी ही मोहीम हाती घेतल्याचे दिसून येत आहे.
देवरुख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्लेश्वर पेट्रोल पंपासमोरील मुख्य डांबरी रस्त्यावर अशोक लेलंड कंपनीची ट्रॅव्हल्स (क्र. एमएच ०४ केएफ ९९६०) सार्वजनिक मार्गावर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी करण्यात आली होती. तसेच वाहनाच्या पुढील बाजूस प्रखर दिवे आणि चारही बाजूंना लाल-निळसर रंगाचे छोटे लाईट लावण्यात आले होते. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्रास व संभाव्य धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाणे येथे चालक स्वप्निल शांताराम कदम (वय ४२, रा. कोंडगे, ता. लांजा) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८५ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम २३५/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत शामराव साळुंखे यांनी दिली.
दरम्यान, लांजा बाजारपेठेतील गोवा-मुंबई महामार्गालगत श्री क्लिनिकशेजारी अशोक लेलंड दोस्त टेम्पो (क्र. एमएच ०८ एपी ६४२७) रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभा करण्यात आल्याचे आढळून आले. या वाहनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. या प्रकरणी लांजा पोलीस ठाणे येथे चालक दिपक सदानंद पावसकर (वय ५९, रा. शिवाजीनगर, लांजा) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८५ अन्वये गुन्हा क्रमांक ९९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी आनंदा कळंत्रे यांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.

